Monday, 17 October 2016

ऋषिकेश देशमुख

                 

             शेतकरी जगला तरच :देश जगेल


            काल परवा रेल्वेने प्रवास करत होतो . प्रवासात काही सहप्रवासी होती ती वेगवेगळ्या विषयांवर बोलत होती . बोलता बोलता शेतीचा विषय निघाला आणि मग त्यांच्या चर्चेतून शेती व शेतीशी निगडित असणाऱ्या  अनेक बाबीचा उलगडा  होत गेला . दोन तीन वर्षांचा सततचा दुष्काळ , दुष्काळातील भीषण  आठवणी डोळ्यात पाणी आणणारे होते . निसर्गाच्या लहरीपणाचा उद्वेग होता तर सरकारबद्दल तीव्र नाराजी होती . या प्रवासातील ही प्रातिनिधिक गोष्ट कशाला आपण सारेच शेती करतो शेतीतील अनिश्चितता आपल्यालाही आता नवीन राहिली नाही . कायम धोका देणारा उद्योग म्हणता येईल एवढी परिस्थिती भीषण बनली आहे .

              देशातील सत्तर टक्के जनता ज्या शेतीवर अवलंबून आहे .ज्या देशाचा आर्थिक कणा 'कृषी'आहे .कृषिप्रधान देशातील हे चित्र कुणाच्याच दृष्टीने चांगले नाही . 'हरित-क्रांती' नंतर लोक शेतीकडे आश्वासक दृष्टीने पाहत होती . पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता सारे चित्र निराशेकडे जाणारे आहे . चारदोन बोटावर मोजण्याऐवढे बागायतदार शेतकरी सोडले तर शेतकरी कायम अधांतरी जीवन जगत आहेत . कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भविष्यातील चिंता पोखरून काढत आहे  . आणि भविष्यही अंधकारमय वाटल्याने लोक आत्महत्येसारखा अविचार करून जीवन संपवत आहेत .जगाचा पोशिंदा असणारा हा बळीराजा आज साऱ्यांच्याच हातच खेळणं बनला आहे  .

                'शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात वाढतो आणि शेवटी कर्जाचाच वारसा देऊन मारतो .' असं शेतकाऱ्यासंदर्भात बोललं जातं आणि हे सत्यही आहे . हे कोणी नाकारू शकत नाही . मुळात शेतकऱ्यांविषयी शासन दरबारी असणारी अनास्था , सावकारी पिळवणूक आणि निसर्गाचे दुष्टचक्र या सर्वांमध्ये फक्त शेतकरी उध्वस्त होतो आहे .  या सर्व गोष्टींचे गांभीर्य वेळीच ओळखले पाहिजे अन्यथा सारेच उपासमारीने मरू यात शंकाच नाही .

                 या वर्षी लवकर पाऊस पडला होता . वेळेवर पेरणी झाली होती . पीक रानात डुलत होती .पण अतिवृष्टीने साऱ्या स्वप्नांवर पाणी फिरवले . क्षणात होत्याच नव्हतं झालं . पीक वाहून गेली . पावसाच्या पाण्यात पीकच नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्यही वाहून जात होते .

                 एखाद्या वर्षी खूप उत्पन्न होते त्या वर्षी शेतमालाला भाव नसतो . असेल त्या भावाने माल विकावा लागतो .त्या उत्पन्नातून सावकाराचे कर्ज फेडावे की गरजा भागवाव्यात या विचित्र विवंचनेत शेतकरी असतो . दिवसेंदिवस आपण नव्या नव्या स्थित्यंतरांना सामोरे जात आहोत . अन्न , वस्त्र , निवारा , शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आटापिटा करावा लागतो आहे . आधी गरजा कमी होत्या आता त्या वाढायला लागल्या आहेत .जागतिकीकरण होते आहे . त्या सोबत आपल्यालाही बदलावे लागणार आहे . बदलत्या काळानुसार आपणही बदल स्वीकारले पाहिजेत . आणि हे सर्व बदल स्वीकारायचे म्हणजे आर्थिक स्थिती मजबूत असावी लागते . ती शेतमालावर होणं अशक्यप्राय वाटतं आहे . 

                राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्याला कर्ज देण्यास टाळाटाळ करतात . म्हणून शेतकऱ्याला सावकारी कर्ज घ्यावे लागते . ते कर्ज अवाच्या सव्वा व्याजाने दिलेले असते . प्रसंग पडलेला असतो म्हणून काही न बोलता किंवा पिळवणूक दिसत असतानाही कर्ज घ्यावे लागते . आपण सारे स्वप्नांवर जगत असतो . पीकपाणी चांगलं होईल म्हणून कर्ज घेतो पण कर्ज काही फिटत नाही . मुलाबाळांची शिक्षण असतात . आई-वडिलांची दुखणी असतात . विवाहयोग्य मुली हुंड्याची तरतूद नसल्यामुळे घरच्या अडचणींना तोंड देणाऱ्या हतबल वडिलांकडे , त्यांच्या संघर्षांकडे पाहत असतात . उत्पन्नाचे साधन एक व गरजा अनंत असं सारं चित्र असत .

                  महाराष्ट्रात सिंचन प्रकल्प व्यवस्थीय राबवले गेले नाहीत . सिंचन प्रकल्प अपूर्ण राहिले .त्यात भ्रष्टाचार झाला न झाला हा वादाचा मुद्दा आहे . पण ती जर व्यवस्थित राबवली गेली असती तर शेतकाऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी पुरवठा झाला असता . पाण्यामुळे समृद्धी आली असती  . जिरायती जमिनी बागायती झाल्या असत्या आणि एक नवे चैतन्य आले असते . पण हे सारे म्हणजे ' आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हणालो असतो ' म्हणण्यासारखं आहे .

                     आता वेळ आली आहे शेती व्यवसायाला समृद्धी मिळवून देण्यासाठी सर्व थरातून हातभार लावला पाहिजे . शासनाने शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे . साठेबाजीला आळा घातला पाहिजे . शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षणात सवलती दिल्या पाहिजेत . 

                     शेती-मातीची त्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या-कष्टकऱ्यांच्या जीवनाची ही बाजू आपण समजून घेतली तरच भविष्य प्रकाशमान राहील अन्यथा लोक शेती करणे सोडतील .'जय जवान , जय किसान' हा नुसता नारा नको तर त्यांना न्याय द्या . त्यांच्या जीवनातील सुखदुःख समजून घ्या . तरच आपण सुजलाम सुफलाम म्हणून घेण्यास योग्य ठरू . आपल्या लहानपणी गुरेढोरे खूप असायची दूध दुभते भरपूर प्रमाणात उपलब्ध असायचे आता ते चित्र पार बदलून गेले आहे .याचे मुख्य कारण म्हणजे आपण त्या जनावरांकडे  केलेले दुर्लक्ष होय . आज दूध व तुपाचे महत्व कळते आहे पण भेटत नाही . अशीच वेळ शेती व शेतीशी संबधीत गोष्टीची होऊ नये ही अपेक्षा .

               " जय जवान , जय किसान "...

                -ऋषिकेश गंगाधरराव देशमुख

                  मु पो : शिळवणी ता : देगलूर जि:नांदेड

                  पिन कोड : ४३१७४१

                   संपर्क : ९९२३०४५५५०

★★★★★★★★★★★★★★★★★★★★


स्वच्छतेचे महत्व
            
               संत गाडगेबाबा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य खर्ची घालून लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला . नुसते कीर्तन करून , तोंडी सांगून नाही तर दिवसभर ते हातात झाडू घेऊन गावच्या गाव स्वच्छ करायचे . 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या वर्तनातून लोकांना प्रबोधित करण्याचा प्रयत्न केला . दिवसा हातातल्या झाडूने गाव स्वच्छ करायची व रात्री किर्तनाने मने स्वच्छ करायची असा त्यांचा कार्यक्रम असायचा . त्यांनी गोरगरिबांना , अडाणी लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्पक व तंतोतंत अशी उदाहरणे देत . अंधश्रद्धेवर आसूड ओढत . त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातल्यावर आत्ता कुठे आपल्याला स्वच्छतेचे सर्वांचे महत्व पटू लागले आहे .
             खरंच आता तरी आपल्याला स्वच्छतेचे महत्व पटू लागले आहे का?  स्वच्छता म्हणजे पावित्र्य , मंगल वातावरण , प्रसन्नता या गोष्टी . आपले घर , परिसर , गाव , शहर , तालुका , जिल्हा , विभाग , राज्य आणि देश स्वच्छ झाला पाहिजे .त्यासाठी आवश्यक आहे ती जनजागृती . जनजागृती करून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे . नव्हे या स्वच्छतेची सुरुवातच आपल्या स्वतःपासून केली पाहिजे . आपल्या वयक्तिक पुढाकाराने आपण स्वतः या कार्याला वाहून घेतलं पाहिजे .
                मन करा रे प्रसन्न
                सर्व सिद्धीचे कारण
              असं संत तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे . मन प्रसन्न केले असता कुठलीही गोष्ट अशक्य नाही . आपल्या मनाचा निर्धार ठाम असावा .त्याने सगळ्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतात असे ते म्हणतात . मग हे मन प्रसन्न राहण्यासाठी आपलं घर , आपला परिसर प्रसन्न असावा लागतो .  त्याला प्रसन्न ठेवण्यासाठी स्वच्छता असायला हवी .
               घाणीच्या साम्राज्यात आपणं दोन क्षण ही थांबू शकत नाही . मात्र ही सारी साम्राज्य आपणच उभी करत असतो . रस्त्यावर पान-तंबाखू खाऊन थुंकत असतो . घरातली घाण , सडलेले कुजलेले पदार्थ , ओला कचरा तर कधी वेगवेगळ्या प्रकारचे टाकाऊ पदार्थ टाकतं असतो . त्यातून कचऱ्याची उकिरडे निर्माण होतात . आणि येथून मग आपली गावं , शहरं रोगांचे माहेरघर व्हायला लागतात . साथीचे आजार पसरतात . गावच्या गाव या रोगाने त्रस्त होतात तेव्हा कुठे आपल्याला कळतं की ,  हे सारं घाणीच्या सहवासातून उदयाला आलं आहे .
                 आज आपण परिसर स्वच्छतेविषयी , वयक्तिक स्वच्छतेविषयी जागरूक होत आहोत ही निश्चितच आनंदाची बाब आहे . मात्र आता याबरोबरच खरी गरज आहे ती मनाच्या स्वच्छतेची .
                संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात , "नाही मन निर्मळ । काय करील साबण ।।" आज आपण उध्वस्त कुटुंबव्यवस्थेचे वाटाडे बनत चाललोय . समाजात वृद्धाश्रमांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रेम , जिव्हाळा ही फक्त सुंदर अर्थपूर्ण शब्द उरली आहेत . एकमेकांबद्दल कमालीची असूया , द्वेष उत्पन्न होत आहेत . आपला संपूर्ण वेळ कामात जातोय . आईवडील वृद्धाश्रमात ठेवली आहेत पण आपली मुलं एकलकोंडी बनत आहेत . त्यांची भावनिक कूचंबना होते आहे . ती संस्काराच्या अमूल्य ठेव्याला पारखी होत आहेत . आपली संकोचित वृत्ती मुलांच्या भविष्याला घातक ठरू लागली आहे . आज आपण एका बोटावर जगाशी बोलत आहोत . आपले विचार व्यक्त करत आहोत पण जेवढे जगाशी जुडलो तेवढेच आपल्या माणसांशी जुडलो आहोत का ?
                    आपल्या माणसांच्या सुखदुःखशी समरस होत आहोत का ?  पूर्वी लोक कमी शिकलेली असतं पण शहाणी असतं आता लोक खूप शिकली पण फक्त हुशार झाली ते शहाणपण कुठेतरी हरवत चालल्याची खंत सतावते आहे . प्रेम , जिव्हाळा असणारी ही माणसं साध्या कापड्यातही आपली वाटायची . आता सुटाबुटात ते आपलेपण उरलं नाही . उरलं नाही म्हणण्यापेक्षा आपण मोठे होत आहोत संपत्तीने , सत्तेने व किर्तीने पण मन बारकी होऊ लागली आहेत . आजीच्या जात्यावरील गाणी ऐकत बसण्याची मजा कुठल्याही डिजेला येणार नाही .
                      स्वच्छतेचे महत्व अनन्य साधारण आहे . पण नुसती भौतीक स्वच्छता नको तर तन-मन-धन स्वच्छता राबूया . एकमेकांशी प्रेम , जिव्हाळ्याने वागू या ...
                - ऋषिकेश गंगाधरराव देशमुख
                 मु पो : शिळवणी ता : देगलूर जि: नांदेड
                  संपर्क : ९९२३०४५५५०
           ईमेल : rushigdeshmukh@gmail.com
         

No comments:

Post a Comment