Monday, 17 October 2016

किशोर झोटे, औरंगाबाद


*शेतकरी जगला तर ; देश टिकेल*

         *उच्चतम शेती*
         *कनिष्ठ व्यापार*
          *निच नोकरी*
    असे समाजकारण मानले जात होते, मात्र आज हा क्रम पुर्णपणे बदलला गेला आहे. भटकणारा समाज याला स्थैर्य प्राप्त झाले तेच मुळी शेतीच्या कामा मुळे.
       माहिला वर्गाने गरोदर काळात भटकंती नको व आयुष्याला एक स्थैर्थ लाभावे त्या मुळे अनुभव व विचार या जोरावर शेतीला सुरवात केली. माणसाची कायम एका ठिकाणी राहण्याची सुरुवात देखील झाली. त्यानंतर प्रगती व्हायला लागली.
      शेती म्हणजे काय तर अन्न, तंतू प्राणी तसेच वनस्पती यांचे व्यवस्थापित उत्पादन होय.जे आदी काळा पासून सुरू आहे.
     आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर कुणबी म्हणजे शेती करणारा वर्ग किंवा जात असा अर्थ होतो. छत्रपति शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांचा देखील ब्रिटीशांच्या कागदोपत्री कुणबी असाच उल्लेख केला गेला होता. ते वेरूळ गावचे पाटील होते आणि पाटील हा शेतकरीच असतो.
       कुणबी हा शब्द कुळ व बीज या दोन शब्दापासून बनलेला आहे. कुळ म्हणजे वंश आणि बीज म्हणजे बी. महाराष्ट्रातील साम्राज्य विस्ताराबरोबर देशात कुणबी पसरले, नंतर त्यांना मराठी भाषा बोलणारे किंवा महाराष्ट्र राज्यातील राहणारे म्हणून मराठा हे बिरूद लागले. कुणबी व मराठा हे वेगळे नाहीतच. देशभरात व्यवसाय मात्र शेतीच.
       शेतीकडे कालांतराने दुर्लक्ष होत गेले. हालाखीचे दिवस इंग्रज राजवटीत आले, त्याला सर्वप्रथम वाचा फोडली ती म.फुले यांनी 1883 मधे शेतकऱ्यांचा आसूड यातून. शेतकरी अडवणूक, शेतीमाल भाव न मिळणे, कर्ज काढुण केलेले लग्न कार्य , सावकारी पाश त्यातून नैराश्य आदि बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. *पाणी आडवा पाणी जीरवा* ही संकल्पना त्यांचीच आहे. अतिशय पोट तिडकीने त्यांनी शेतकरी वर्गाच्या समस्या मांडल्या.
     तेंव्हा पासून त्या समस्या आजही वाढत आहे. ती समस्या पुढे 1928 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीत बदलवली. खरं तर तेच खरे शेतकऱ्यांचे कैवारी होत. कोकणातील खोत पध्दती विरुद्ध आंदोलन सुरू केले. 17 सप्टेंबर 1937 खोत पद्धत नष्ट करण्यासाठी कायद्याचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले. 10 जानेवारी 1938 ला 25 हजार शेतकऱ्यांचा विराट मोर्चा त्यांनी विधिमंडळावर नेला होता.
     भारतासारख्या कृषीप्रधान देशात *पाणी आणि वीज* यांचे समानरीत्या पुरवठा झाला तर भारत एक समृध्द देश होण्यास वेळ लागणार नाही. असे त्यांचे परखड मत होते. नदया जोड प्रकल्प ही त्यांचीच योजना होती. सावकार व खोतांना ते आयत्या बिळावरचे नागोबा म्हणत. त्यांनी महत्वाची संकल्पना मांडली ती म्हणजे *शेतीचे राष्ट्रीय करण* करणे होय. म्हणजेच समुदायीक शेती प्रकार.
     मात्र खेदाची बाब म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी हे ग्रामिण भागातील असूनही शेतीकडे लक्ष देत नाहीत. *जय किसान* ही फक्त घोषणा राहीली आहे. शेतीला अशा स्थरावर नेले आहे की  शेतकरी म्हणवून घ्यायला आजच्या पिढीला कमी पणा वाटतो. शेतीला आधी शेतकरी खरेदी करू शकत होता आता त्यात बदल केल्याने काळा पैसा यात आला आणि शेती हा आलटी पलटी चा व्यवसाय झाला. आता अलिकडे NA ची अट काढून काळी मातीची शेतजमीन प्लॉट विक्रीची होत आहे.
      सेझ ( स्पेशल इकॉनॉमिक झोन ) या मुळे कारखानदार याच्या घशात शेतजमीनी जात आहेत. हातात पैसा येत आहे मात्र त्यामुळे व्यसनाधीनता व घरगुती कलह वाढले आहेत. भौतिक सुविधाकडे कल वाढत आहेत. तसेच पैसा उधळपट्टी होवून आजचा शेतकरी उदयाचा भीकारी होत आहे.
        शेती विषय व नवनविन तंत्रज्ञान शेती व नव्या शेतकरी पिढी पर्यंत न गेल्याने परंपरागत पिके घेतली जात आहेत. त्यात सरकार हमी भाव न दिल्याने शेतकरी हवालदिल होत आहे व आत्महत्या प्रकार वाढत आहेत. 70-75% शेतीवर आज ही परिस्थीती आली आहे. जो आपला पोशिंदा त्याकडेच लक्ष दयायला कोणी तयार नाही.
     शेती विषय प्राथमिक स्तरापासून सुरू करुन शेतीला पुन्हा उच्च दर्जा आणून दयावा लागेल. शेतीला प्रतिष्ठा आणावी लागेल. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी हमी भावा बरोबर , प्रत्येकाला शेती वितरीत व्हावी तसेच कष्टणाऱ्या शेतकऱ्याला पेंशन लागू व्हावी.
      शेतकरी जगाला तर देश टिकेल त्यासाठी फक्त म.फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती व शेतकरी विषयक विचार अवलंब करणे राजकण्यांंना आवश्यक आहे व आपणास विविध माध्यमातून जागृती करुन राजकरणी मंडळीवर दबाव टाकणे.
         मागे एक VDO क्लिप व्हायरल झाली होती , कामासाठी एक तरुण फोन करतो, पालिकडील व्यक्ती त्याला 2 लाख पर्यंत गुंतवणुक , सुट्टी नाही, मुलाबाळा सोबत काम करावे लागेल, ओवर टाईम ही करावा लागेल, या अटी घालतो व पगार काहीच नाही असे कळते. तेंव्हा फोन करणारी व्यक्ती त्याला म्हणते मी पागल आहे का अशी कोणती व्यक्ती आहे का जी हया अटी मान्य करेल.
       तेंव्हा पालिकडिल व्यक्ती म्हणते होय एक व्यक्ती आहे, *माझा शेतकरी* तेंव्हा फोन करणारी व्यक्ती निरुत्तर होते व शेतकऱ्याचे आभार मानते.
     अशी प्रतिष्ठा शेतकऱ्यांना पुन्हा मिळवी त्यासाठी 1940 ला म.फुले यांच्या विचाराने साने गुरुजी यांनी शेतकऱ्यास हाक दिली , त्यांना बोलावले...
*रात्र दिवस तुम्ही   करीत असा काम*
*जीवनात तुमच्या   उरला नाही राम*
*घाम गळे तुमचा     हरमाला दम*
*येवो आता तुम्हास   थोडा तरी त्वेष*
*येथून तेथून सारा     पेटू दे देश*
       या ओळींची ही आठवण होते.

किशोर झोटे@32
जि.प.प्रा.शाळा ढोरकीन तांडा,
कें. ढोरकीन ता. पैठण जि. औरंगाबाद.
मो.नं.9423153509
Samyakharshali@gmail.com
★★★★★★★★★★★★★★★★★★★
साहित्य दरबार वैचारिक लेखमाला

*विषय :- स्वच्छतेचे महत्व*

      विदया बालनची सरकारी जाहिरात असो की हँडवॉश कंपनी ची जाहिरात प्रत्येका मधुन स्वच्छतेचा संदेश दिला जातो. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता ही आवश्यक बाब आहे. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते असे म्हणतात. निरोगी शरीरासाठी निरोगी परिसर हवा व त्यासाठी वैयक्तिक व परिसर स्वच्छता असावी लागते. तसेच निरोगी समाजासाठी स्वच्छ परिसर आवश्यक असतो.
     अशा निकोप समाज रचने साठी सर्व प्रथम प्रयत्न केला तो राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी. दिवसभर गावातली घाण साफ करत आणि रात्री लोकांच्या डोक्यातील घाण काढत. स्वच्छतेकडून समृध्दीकडे जाण्याचे मार्ग गाडगेबाबा यांनी दाखवले.
      तोच धागा पकडून महाराष्ट्र शासन यांनी सन 2000-2001 मधे "संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान " सुरू केले. तीच योजना केंद्र सरकारने 2014 ऑक्टोबर 2 ला गांधी जयंती ला उचलली व "स्वच्छ भारत अभियान " सुरू केले आहे. महाराष्ट्राने केंद्राला दिलेला हा एक चांगला उपक्रम म्हणता येईल. अतिशय चांगल्या पध्दतीने हा उपक्रम आजही प्रधानमंत्र्यांच्या उत्सफुर्त सहभागाने चालू आहे.
      शालेय पातळीवर शा.शि. या विषयात "आरोग्य शिक्षण " या घटकाचा समावेश केला आहे. मात्र बऱ्याच प्रमाणात त्या घटकाकडे दुर्लक्ष केल्या जाते.त्याकडे लक्ष देवून जर वैयक्तिक स्वच्छता याकडे लक्ष दिले तर नक्कीच एक निरोगी पिढी घडेल. अंघोळ,नखे व केस कापने, कपडे स्वच्छता, कान व नाक स्वच्छता इ. बारीक सारीक गोष्टी लहानपना पासुन शिकवल्या तर पुढे आपोआप स्वच्छतेच्या सवयी लागतील. लहान पनी केलेले संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात. वैयक्तिक स्वच्छता हा सुद्धा एक  संस्काराचा भाग होणे गरजेचे आहे.( ग्रामिण भागात याकडे आजही लक्ष दिले जात नाही.)
     वैयक्तिक स्वच्छता आवड निर्माण झाली की समाजात वावरताना ती व्यक्ती स्वच्छतेचे नियम पाळते. आपले घर जसे आपण स्वच्छ ठेवतो तसेच परिसर सफाई हेही आपले कर्तव्य आहे , याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. फक्त वैयक्तिक स्वच्छता किंवा घरातील स्वच्छता महत्त्वाची नसून जेंव्हा पुर्ण वस्ती शहर स्वच्छ होईल त्याच वेळस निरोगी पिढी तयार होईल.
     आज जे साथीचे आजार आपण पाहतो ते बऱ्याच वेळस या अस्वच्छतेमुळेच होतात. त्यामुळे स्वच्छता ही महत्वाची आहे. मात्र फक्त मी व माझे घर स्वच्छ नको तर सर्व गाव शहर स्वच्छ हवे. कालच १५ ऑक्टोबर "जागतिक हात धुवा " दिन आपण साजरा केला आहे.
        हात धुणे हे खूप महत्वाचे आहे. अगदी शौचास जावून आल्यावर , जेवना आधी हात धुणे महत्वाचे आहे. शौचास जाणे हे नैसर्गिक असले तरी शौचालयाचा वापर करावा हे सुध्दा सांगणे गरजेचे आहे. हाथ अगदी राख किंवा मातीने जरी धुतले तरी योग्य होय. उपलब्ध साधनांचा ही वापर कसा  करावा ते समजावून दयावा लागेल.
      तीसरीला ओला व कोरडा कचरा असे शिकवले आहे. त्याचा वापर केल्यास कचरा कसा संकलन करावा तेही कळेल. कचरा कसा होतो कचरा कमी कसा करता येईल या बाबतीत मागदर्शन ही करता येईल.
       हे घडत असतांना स्वच्छतेने उत्पन्न होणारा कचरा त्याची विल्हेवाट कशी लावावी ही देखील समस्या निर्माण होत आहे. शहर व गाव दोन्ही कडे असे कचरा पासून मुक्ती देणारे प्रकल्प निर्माण करून ही समस्या सोडवावी लागेच. नाहीतर डंपींग ग्राउंड वरुन बरेच वाद घडताना दिसत आहेत. काही शहरात कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, मात्र बऱ्याच ठिकाणी उघड्यावरच फेकला किंवा साठवला जातो. त्यातुन आरोग्याच्या वेगळ्या समस्या निर्माण होत आहेत.
      त्याच बरोबर कचरा गोळा करणारे लोक व त्यांच्या आरोग्याच्या समस्या याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ फोटो काढण्यापुरते हातात झाडू घेणारे यांना आपण प्रसिद्धी देतो, त्याचप्रमाणे दररोज हे काम करणारे लोक यांनाही कुठेतरी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्या सफाई कामगार वर्गाची देखील आपणास जाण ठेवावी लागेल. उपेक्षीत घटक म्हणून न बघता त्यांनाही समाजात योग्य स्थान व मान मिळाला पाहिजे. सामाजीक आरोग्यासाठी सतत कार्यरत असणारा तो देखील एक महत्वाचा घटक होय.
    स्वच्छता ही जशी शरीराची तशीच मनाची ही ठेवावी लागेल, नाहीतर म्हणावे लागेल, " नाही निर्मळ मन, काय करील साबण. "

किशोर भीमराव झोटे @ 32
जि.प.प्रा. शाळा ढोरकीन तांडा कें. ढोरकीन ता. पैठण जि. औरंगाबाद.
9423153509
Samyakharshali@gmail.com

No comments:

Post a Comment