Monday, 17 October 2016

बंडोपंत कुलकर्णी, सोलापूर

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
साहित्य दरबार

स्वच्छतेचे महत्व

             आज आपल्या देशात स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा प्रसंग उदभवले आहे, हे या देशाचे दुर्दैव आहे. किंबहुना संपूर्ण जगात प्रथमतः मनुष्य जीव या भारत वर्ष भूमीवर जन्माला आला म्हंटल्यास वावगे होणार नाही. कारण इतरत्र मानव जीव जन्माला आल्याचे वा या भूमीशिवाय अन्य भूमीवर जीव जन्माला आल्याचे पुरावे नाहीत. याचा अर्थ मनुष्य जगण्याची आणि आचरण कला प्रथमतः इथेच निर्माण झाली. मग येथील लोकांना स्वछता आणि त्याची माहिती नाही, असे म्हणूच शकत नाही. येथील लोकांना पूर्वीपासून स्वच्छतेचे महत्व माहीत आहे, याचे अनेक उदाहरणे देता येतील.

               पूर्वीच्या काळी महिला पुरूष अंथरुण सोडण्यापूर्वी स्वतः उठून घर कामाला सुरुवात करीत असत. पुरुष मंडळी सुद्धा उठायचे. प्रथम घर, अंगण आणि सर्व परिसर झाडून लोटून स्वच्छ करीत असत. त्यांनतर सडा रांगोळी व्हायचे. मग अंघोळी व्हायच्या. त्यांनतर देवासमोर दिवा लाऊन प्रार्थना करायचे. मग पुढील व्यवस्थेला लागायचे. हे सर्व सूर्योदयापूर्वी वा सूर्योदयाच्या जवळपास उरकायचे. पूर्वीच्या काळी ग्यास, स्टोव्ह वगैरे कांही नव्हते. घरी चुलीवर स्वयंपाक शिजविले जात असे. स्वयंपाक झाल्याबरोबर लगेच चूल व स्वयंपाकघर सारवून लोटून स्वच्छ केले जायचे. आज सोवळे, ओवळे यास नावे ठेवले जाते. पण सोवळे ओवळे हे एक स्वच्छत्याचाच भाग होता व आहे. सोवळे ओवळे याच्या नावाखाली अवडम्बर माजविण्यात आले, हे खरे आहे. हे सर्व कशाचे धोतक आहे. हे सर्व स्वच्छताच आहे.

               या सर्व गोष्टीमुळे भारतातील लोक स्वच्छतेचे महत्व जाणत नव्हते असे नाही तर स्वच्छता ही भारतीयांच्या धरोहर, संस्कृती आणि संस्कारात आहे. पण आज स्वच्छतेचा प्रश्न आ वासून उभा आहे. असे का घडले व या मागची कारणे यावर चिंतन होणे आवश्यक झाले आहे.

                   भारतात लोकांचे लक्ष आपल्या कर्तव्यापेक्षा मानपानाकडे अर्थातच अहंकार जपण्यावर जास्त आहे. यातूनच मनात कर्मवृत्ती बद्दल विचार रुजू लागले. याचे प्रत्यन्तर म्हणजे अमुक काम हीन दर्जाचे, तमुक काम मध्यम आणि ठराविक काम उत्तम असे लोकांनी आपल्याच मनाने ठरविले. अशाप्रकारे सेवाभाव वृत्तीही दर्जात्मक वर्गात विभागली गेली. भीक मागून मिळालेल्या पैशाने पोट भरणे व चोरी करून त्या पासून पोट भरणे, यात उदरभरण करण्याच्या कसोटीवर काही फरक नाही.
कारण दोन्ही ठिकाणी उदरभरण स्वतःच्या उत्पन्नातून नाहीच. पण भिक्षा मागून उदरभरण करणे हे चोरी करून उदरभरण करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण भावनात्मक दृष्टीने भिक्षा मागणे श्रेष्ठ आहे. याला धार्मिक आणि आध्यात्मिक पातळीवर सुद्धा मान्यता आहे. बरेच साधू, वैरागी वगैरे भिक्षा मागून उदरभरण केले व करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक काम हे त्या त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. फक्त त्याकामात नैतिकता हवी. नैतिक मार्गाने केलेले प्रत्येक काम श्रेष्ठ आहे. पण पूर्वी नमूद केल्याप्रमाणे मनुष्य अहंकारात स्वतःच ठरविलेल्या हीन दर्जाचे काम करणे म्हणजे त्यांच्या अहंकाराला ठेच आणि त्याना त्यात कमीपणा वाटू लागले. त्यामुळे ते परावलंबी झाले व स्वतः आळशी झाले. यातून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत गेले. पुढे इतके दुर्लक्ष झाले की लोक स्वार्थी झाले.  मग त्यांचे परिसरापासून दूर होत होत तेच विचार घरापुरते मर्यदित झाले. पुढे घराकडे देखील दुर्लक्ष होऊ लागले. ह्यामुळे अस्वच्छतेचा प्रश्न तयार झाला.

                   अस्वच्छतेचे परिणाम महा भयंकर आहेत.जिथे दुर्गन्धी असते तिथे भयंकर रोग निर्माण करणारे किटाणू तयार होतात. आज डेंगू, झिका, स्वाईन फ्लू व मलेरिया असे सर्व आजार त्याचाच परिणाम आहे. शिवाय सभोवताली अस्वच्छता दिसल्यानंतर मन अप्रसन्न होऊन कर्म करण्यात रमत नाही. त्यामुळे आळस वाढून सम्पूर्ण आयुष्य वाया जाण्याची शक्यता आहे. लेख वाढू नये म्हणून पुढील विषय घेऊ.

                  आता पुन्हा पूर्वीप्रमाणे स्वच्छता आणणे आवश्यक आहे. स्वच्छ सुंदर आणि निर्मळ परिसर हे सुखी जीवनचा पाया आहे. जिथे स्वच्छता तिथे आंनद आणि जिथे आंनद तिथे ईश्वर असतो. कारण आंनद हेच ईश्वर आहे. एकदा स्वच्छता केले म्हणजे कायमची स्वच्छता झाली असे म्हणता येणार नाही. त्यासाठी प्रथम मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. एकदा तशी मानसिकता तयार झाली म्हणजे मग मनुष्य त्याला आपले कर्तव्य समजतो.  कुठेही अस्वच्छता दिसताच कर्तव्याची जाणीव होत राहते. मग स्वच्छतेसाठी पुढाकार घेतो. यातून निरंतरता येते. त्यामुळे स्वच्छतेचे महत्व ओळखून स्वतःचे घरच नव्हेतर परिसरसुद्धा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यासाठी स्वतःच्या घरापासून स्वच्छता सुरू करणे आवश्यक आहे.

                   बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
                   समूह क्रमांक १३
kbandopant@yahoo.com
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

No comments:

Post a Comment