Sunday, 12 June 2016

संगीता देशमुख


शेतकरी टिकला तर देश टिकेल*


नुकताच दसरा हा सण साजरा झाला,सर्वानी आनंदाचे सोने लुटले. पण यात सर्वात दुखी होता तो शेतात सोनं  पिकवणारा,झेंडूची फुले पिकविणारा शेतकरी! कारण यंदा दसऱ्याच्या दिवशी आणि अजून दोन दिवस सर्वत्र एकच चर्चा होती की,ती यंदा झेंडूची फुले ५ रु. किलोप्रमाणे विकल्या गेली याची! दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या डोळ्यात जेवढा स्वप्नाचा  केशर फुलला होता, दसऱ्यानंतर तेवढाच उद्वेगाचा अंगार डोळ्यात साचला होता. कारण होते,शेतकऱ्यांच्या झेंडूच्या फुलांना मिळालेला भाव! तो भाव शेतकऱ्यांनाच नाहीतर कोणत्याही विवेकी, संवेदनशील माणसाला कमालीचा अस्वस्थ करणारा होता. ज्या शेतकऱ्याने जो झेंडू रक्ताचे पाणी करून पिकवलेला तोच झेंडू शेतकऱ्याला मातीमोल भावाने विकावा लागला. आज मातीही पाच रु. किलोने मिळणार नाही,आज बिसलरीचे पाणीच २० रु. लिटर मिळते तिथे शेतकऱ्यांच्या पिकाला हा  भाव! शेतकऱ्याने खरच का पिकवावी शेती?
         मागील वर्षी झेंडूच्या फुलांना मागणी खूप होती,भावही थोडा बरा  होता म्हणून यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांचे पीक घेतले. तसे पहाता त्यांची लागवड, निगराणी करणे,अळी-किड्यापासून बचाव करण्यासाठी खर्च कमी येणारच नाही.तरी पदरमोड करुन अनेक शेतकऱ्यांनी आशेपोटी  झेंडूची पिके घेतली आणि पदरात घोर निराशेशिवाय काय पडले? शेतकऱ्यांविषयी जाहिरनामा घेऊन सरकार वारंवार बदलतात पण शेतकऱ्यांसंबधी धोरणे मात्र बदलत नाहीत.आता शेतकऱ्यांनी स्वतः निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कोणीतरी येऊन आपल्याला वाचवेल,या गर्तेतून बाहेर काढेल,याची वाट न पाहता गावपातळीवर,तालुका पातळीवर शेतकऱ्यांची युनियन होणे गरजेचे आहे. ज्या हंगामात आपला माल बाजारात विक्रीसाठी येणार असतो,त्यापूर्वी सर्वानी स्वतःच आपल्या मालाला एक हमीभाव ठरवून द्यायला पाहिजे. काहीही झाले तरी या ठरलेल्या  भावाच्या कमी भावात आपला माल विकायचाच नाही व कोणाला विकूही द्यायचा नाही. यात जो शेतकरी परिस्थितीला शरण जाऊन भाव कमी करुन विकण्याचा प्रयत्न करेल त्याला तिथेच अडवायला हवे अन्यथा त्याला तिथून उठवावे. दुसरी बाब म्हणजे,शेतकऱ्यांनी आपला कोणताही माल दलालामार्फत विकण्यापेक्षा सर्वानी एकत्र येऊन भाव ठरवून स्वत: विकण्याचा प्रयत्न करावा. मला माहीत आहे,भाव येईपर्यंत  लोकांची केलेली उधारी,सावकार तुमच्यामागे तगादा लावतील. पण हा त्रास सुरुवातीस काही वर्षे होईल. पण हळूहळू नक्कीच जम बसेल. ही बाब आज अवघड वाटत असली तरी अशक्य मात्र अजिबात नाही. तुम्ही पिकवलेल्या उत्पादनावर दलाल भरमसाट कमावतो आहे. ही बाब फक्त झेंडू उत्पादनाच्या बाबतीतच नाही,सर्वच मालाच्या बाबतीत हीच भूमिका ठेवायला हवी,झेंडू फुले हे निमित्तमात्र आहेत. यासाठी आधी सर्व शेतकऱ्यांना स्वमताने एकत्र येणे आवश्यक आहे. एकीच्या बळाचे महत्व राजर्षी शाहू महाराजांपासून महात्मा फुल्यांनी पटवून दिले आहे. त्याचा अंगीकार शेतकऱ्यांनी करायला हवा. आज जर आजूबाजूला पाहिले तर लक्षात येईल की,बऱ्याचदा ऑटोवाला किंवा रिक्षावाला आपल्याला त्याचे ठरावीक भाडे सांगतो,आपण घासघिस केली तर तो सरळ नकार देऊन आपल्यासमोरुन रिकामा ऑटो किंवा रिक्षा नेतो. पण तडजोड म्हणून तो कमी भावात प्रवाशाला नेतच नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनीही आपला माल आपला खर्च नफा काढूनच विकण्याच्या निर्णयावरच ठाम रहावे. "कल करे सो आज,आज करे सो अब!" याप्रमाणे दसऱ्याच्या वेळी ५रु. किलोने झेंडूफुले विकून शेतकऱ्यांनी जे स्वतःचे नुकसान करुन घेतले त्याची भरपाई करण्याची संधी गमावू नये. आता दिवाळीसारखा हिंदूचा मोठा सण आलेला आहे. या सणाला अनेक खरेदी सोबत झेंडूफुलांची खरेदी ही मोठ्या प्रमाणात केल्या जाईल. तेव्हा शेतकऱ्यांनी कितीही फुले बाजारात आली तरी किमान ५० रु. किलोपेक्षा कमी भावाने फुले विकूच नये. ५०० रु मिळविण्यासाठी ५ रु. भावाने  १००किलो फुले विकण्यापेक्षा ५०रु.भावाने १०च किलो फुले विकली तर किमान स्वतःच्या कष्टाचे चीज झाल्याचा आनंद तर मिळेल. उरलीच फुले तर ती  शेतात नेऊन मातीत कुजवून  त्याचे खत करावे. म्हणतात "म्हातारी मेल्याचं दु:ख नाही,पण काळ सोकावतोय याचे वाईट वाटते." शेतकऱ्याकडे भरपूर पीक आले की ते स्वस्तच मागायचे,ही मानसिकता कुठेतरी बदलायला हवी. जेणेकरून शेतकऱ्यांची मजबुरी समजून ग्राहक शेतकऱ्यांचा बळी तरी घेणार नाही. 
       शेतकऱ्यांची मजबूरी पाहून त्यांचा माल  अशा मातीमोल भावात मागणे म्हणजे शेतकऱ्यांचा बळी घेणे नव्हे का? कारण आपला विवेक जागृत असला तर आपण पांढरपेशानी थोडा विचार करावा. जे ग्राहक शेतकऱ्यांच्या मालाला घासघिस करुन भाव कमी करुन मागतात,त्यांच्याकडे असलेल्या चैनीच्या वस्तूचा भाव त्यानी कुठलीही घासघिस न करता छापील किमतीत खरेदी केलेला असतो. जीवनावश्यक वस्तू सोडून चैनीच्या वस्तूंच्या महागाईवर कोणीही आवाज उठवत नाहीत.याही उलट अनेकजण कितीतरी वायफळ खर्च करतात अन् शेतकऱ्यांच्या मालाला मात्र घासघिस करतात. कारण आज फक्त शेतकऱ्यांचेच उत्पादन असे आहे की ज्याला हमीभाव नाही.आज भौतिकवाद एवढा वाढला की,अनेक महागड्या  वस्तू आपण खरेदी करतो. तर मग यापुढे आपणही ठरवू की,थेट शेतकऱ्याजवळच्या मालाला घासघिस न करता त्यांच्या कष्टाचे चीज करुया. आपल्या खरेदीमुळे त्या बळीराजाचाही सण नक्कीच आनंदात साजरा होईल. अनेकदा येणारा ओला ,कोरडा दुष्काळ शेतकऱ्याच्या पदरात काही पडू देत नाही, तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही आणि यावर कुरघोडी म्हणजे आपण पांढरपेशे लोक शेतकऱ्यांची उरलीसुरली पिळवणूक करतोय. आज सर्वांच्या जीवनावश्यक वस्तू पिकविणारा निर्माताच अशा कारणाने आत्महत्येच्या दारात उभा आहे. या बळीराजाला आत्महत्येचा नाही तर आत्मविश्वासाच्या दारात उभे करण्याचे काम आपण संवेदनशील,विवेकी लोक नक्कीच करु शकतो. पण शेतकऱ्यांनीही आता स्वमतावर ठाम राहून स्वत:चा मार्ग स्वतःच निवडण्याची आली आहे. कुठल्याही दलालाशिवाय स्वतः थेट बाजारपेठेत उतरण्याची वेळ आली आहे.  यासाठी शेतकऱ्यांना थोड्या संयमाची आणि आत्मविश्वासाची गरज मात्र नक्कीच आहे.कारण शेतकरी टिकला तर देश टिकेल.
"लाख लोक मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगायला हवा"
*संगीता देशमुख@
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
शिक्षक कालचा आणि आजचा 
आपल्या देशात प्राचीन रामायण-महाभारतामधील गुरूपासूनचा  प्रवास आज 'टिचर' पर्यंत येऊन पोहोचला आहे. त्याकाळी राजघराण्यातील मुले गुरूगृही  जाऊन वेगवेगळ्या विद्या,ज्ञान संपादन करीत असत. गुरू आणि शिष्याच्या नात्यात कुठलाही किंतु नसायचा. जीवनाला  योग्य वळण देण्याचे काम गुरू करीत असत,किंबहुना तेच आपले जीवनकार्य मानत असत .राजानी दिलेली गुरुदक्षिणा ही ऐच्छिक  असायची. गुरू गरीबच असत. तरी त्यांच्याघरी राजपुत्रानी दैनंदिन कामे करणे ही गुरूसेवा समजली जायची. आणि ही गुरुसेवा राजपुत्र अगदी निष्ठेने करीत असत. गुरू आपल्या कुवतीनुसार राजपुत्राना निसर्गाच्या सहवासात शिक्षण देऊन कर्तव्य पूर्ण करीत असत.म्हणूनच -
"गुरुर ब्रम्हा,गुरुर विष्णू,गुरुर्देवो महेश्वरा|
गुरुर साक्षात परब्रम्ह,तस्मै श्री गुरुवर्ये नम:||"
एवढा गुरुप्रति आदरभाव त्या  शिष्यालाच  नाहीतर समाजाला सुध्दा होता.द्रोणाचार्यासारखा गुरू,एकलव्यासारख्या  शिष्याला विद्या न देताही गुरुदक्षिणेचा मात्र दावेदार ठरायचा! त्यात पीडित एकलव्याला किंवा समाजालाही ते गैर वाटत नसे.
        त्यानंतरच्या काळात या गुरूचे स्थान व्यावसायिक 'गुरूजी'नी घेतले. गुरुजी आणि विद्यार्थी यांचे नाते घनिष्ठ असायचे. हे  गुरुजी फक्त शाळेतील विद्यार्थ्यांचाच मार्गदर्शक नसायचे;तर त्या गावातील सर्व कारभार,लग्ने,महत्वाची कामे यात मार्गदर्शन करण्याचे कामही गुरूजीनाच करावे लागायचे. कोणत्याही कामात त्यांचाच सल्ला महत्वाचा ठरायचा.म्हणूनच शेतातली नवाळी असो,घरातील शिजलेला नवा पदार्थ असो,आधी गुरुजीच्या घरी अगदी नित्यनेमाने, सेवाभावाने आणि व्रतस्थपणे जात असे.शिक्षक हे शाळेपुरते मर्यादित नसून त्यांची बांधिलकी समाजाशी असायची.मिळणाऱ्या  तुटपुंज्या पगारात संसार चालवून ते समाधानी असायचे. निर्व्यसनी,सालस,कर्तव्यनिष्ठ,कर्तव्यतत्पर असायचे. विद्यार्थ्याशी भावनिक नाळ चांगली जोडलेली असायची. विद्यार्थ्याला घरची अडचण असो अथवा शाळेची,शिक्षक हे  भावनिक,मानसिक,सामाजिक  आधारस्तंभ  वाटायचे. शिक्षक असूनही गावाशी,शेतीशी नाळ जोडलेली असायची.म्हणूनच समाज व विद्यार्थी त्या शिक्षकाकडे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आदराने पाहायचे. विद्यार्थी सुध्दा आपले आदर्शस्थान,श्रध्दास्थान म्हणून आपल्या शिक्षकाकडे पहायचे. आणि त्याकाळी आदर्श मानावा असे जीवनमान सर्वच शिक्षकाचे असायचे. शिकवण्यातून मिळणाऱ्या पैशापेक्षा विद्यार्थी घडविण्यात जास्त आनंद असायचा.
          हे झाले कालपर्यंतचे शिक्षक! आपण आपल्या वडिलाना,आजोबाना त्यांच्या शिक्षकाबद्दल बोललो तर आजचा शिक्षक आणि कालचा शिक्षक यांच्यातील बदलते स्वरुप आपल्या लक्षात येईल. कारण  आजचा शिक्षक हा आज आपणासमोरच आहे. आज सर्वत्र इंग्रजी शाळांचे पेव फुटले आणि गुरूपासून गुरुजी,आणि गुरुजीपासून टिचर असे स्वरुप बदलत गेले.इंग्रजीपुढे  मायबोलीतला गोडवा जसा सपक झाला तसा गुरुजीमधला आदर कमी होऊन विद्यार्थ्याच्या आणि समाजाच्याही नजरेत आजचा शिक्षक हा "आधर"झाला. काळ बदलतो तशा सर्वच बाबी बदलत जातात. तसे शिक्षणक्षेत्रात फारमोठे संक्रमण झालेले आहे.आजच्या शिक्षकाची गावाची नाळ तुटली. त्यांच्या मनाला आणि पायालाही ओढ ही शहराची लागली. मातीच्या सहवासातून येणारा मनाचा ओलावा कमी झाला आणि शहरातील फ्लॅटमध्ये राहून भावनाही फ्लॅट व्हायला लागल्या. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमापुरताच संबंध उरला. त्याहीपलीकडे आजच्या विद्यार्थ्याला शाळेतल्या शिक्षकापेक्षा बाहेरच्या खासगी शिकवणी घेणारा पोटभरू ( गल्लाभरू )शिक्षक हा जवळचा वाटू लागला.आजच्या पालकांचाही विश्वास हा शाळेतील शिक्षकापेक्षा खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकावरच अधिक दिसून येतो.आजच्या शिक्षकांचाही  शाळेत विद्यार्थ्याना शिकवण्यापेक्षा त्याच विद्यार्थ्याना खासगी शिकवणी घेऊन शिकवण्याकडे कल वाढला आहे.पूर्वीसारखे आजही आधुनिक  द्रोणाचार्य पुन्हा दिसू लागले. त्या द्रोणाचार्याने एकलव्याला न शिकवता त्याचे श्रेय घेतले होते,त्यानी अगंठा मागितला होता. आजचे खासगी शिकवण्या घेणारे द्रोणाचार्य हे असेच आपण न शिकवलेल्या पण  यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव  आपल्या फ्लेक्सवर लावून त्याचे श्रेय घेताना दिसून येतात. म्हणूनच एक यशस्वी विद्यार्थी एकाचवेळी  अनेक फ्लेक्सवर झळकताना दिसतो. वेतनातून मिळणारा पैसा कमी वाटू लागल्याने की काय,शिक्षकी नोकरीसोबतच अजून एखादा जोडधंदा स्वीकारण्याकडे कल वाढला. त्यामुळे आपोआपच शिक्षकी पेशावरची निष्ठाही ढळली. हे सांगण्याचे वैषम्यही वाटते की,आजच्या शिक्षकाजवळ पहिल्यापेक्षा अधिक पैसा जवळ खुळखुळु लागल्याने आजचा शिक्षक व्यसनाधिन  बनला आहे. संध्याकाळी गावातील लोकांसोबत गावच्या  पारावर बसून लोकांशी नाळ जोडणारा  शिक्षक आज संध्याकाळी नित्यनियमाने  बारमध्ये बसताना दिसतो.आजचे सर्वच शिक्षक असे  आहेत असे मी म्हणणार नाही,याला काही सन्माननीय अपवादही आहेत,जे की आजही अनेक विद्यार्थ्याना ते दिपस्तंभच  वाटतात. आजचेही अनेक शिक्षक समाजोपयोगी कार्य करताना,समाजाशी नाळ जोडलेले दिसून येतात.पण खेदाने सांगावे लागते की,हे प्रमाण फार कमी आहे. आज जिल्हा परीषदेच्या शाळा ह्या फार मोठ्या संक्रमणातून जात आहेत. त्या अनेक शाळानी आज कात टाकलेली आहे.अनेक शाळातील शिक्षक फार मोठ्या जिद्दीने या बदलासाठी पेटून उठलेले दिसून येत आहेत.आणि हा बदल गरीब,ग्रामीण विद्यार्थ्यासाठी खूप मोठी पर्वणी ठरणार आहे. स्वामी विवेकानंद यानी  म्हणाले होते की ,If a poor student can not come to education,education itself must go at his doorsteps .आजचा शिक्षक हा गरजूपर्यंत ज्ञान घेऊन पोहोचला आहे.यातून अनेक संवेदनशील लोकांच्या मनाला कुठूनतरी एक आशेचा किरण दिसू लागला आहे,पुन्हा एकदा खूप मोठ्या काळानंतर गरीबांसाठी शिक्षण येवू पहाते आहे. हा आशादायी बदल चिरकाल टिकावा एवढेच! त्यासोबतच आज शिक्षकावर आलेल्या शिक्षणेत्तर कामाचा बोजा कमी झाला तर,शिक्षक विद्यार्थी घडविण्यासाठी अधिक वेळ देईल,अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.असे घडले तर पुन्हा एकदा समाज- विद्यार्थी-शिक्षक यांचे नाते दृढ होईल. साने गुरुजी म्हणतात,
"तुम्ही आदर्श असाल की नाही माहीत नाही,पण तुमच्यापुढे बसलेले १५०-२००विद्यार्थी मात्र तुम्हाला आदर्श मानतात. त्याप्रमाणे आपले आचरण असावे!" एवढे जरी आजच्या शिक्षकाने मनावर बिंबवले तर  आजचा शिक्षक स्वत:च्याही मनात आदर्श बनू शकतो.

संगीता देशमुख, वसमत
@१४
=========================================
कथा
इयत्ता आठवीच्या वर्गात मराठीच्या बाई आल्या. आल्याबरोबर मुलीनी शिरस्त्याप्रमाणे  मराठीचे पुस्तक बाईंच्या हातात दिले. बाईंनी 'दुसऱ्या संधीचे सोने' हा पाठ शिकवायला घेतला. सुनिता विल्यम्स समजून सांगण्यासाठी भारतीय अंतराळविरांगणा कल्पना चावलाचे उदाहरण देऊन मुलींनी निर्भय कसे व्हावे,अडचणीची शर्यत कशी पार करावी,त्यांच्यात निर्णयक्षमता कशी असावी,हे सांगत असतांना बाईंच्या लक्षात आले की,एक मुलगी मुळुमुळु रडत आहे. बाईना  शिकवताना स्वत:चं तर काही चुकलं नाही ना,असे क्षणभर वाटले. त्या मुलीच्या जवळ जात बाईनी त्या मुलीला जवळ घेतले आणि तिच्या रडण्याचे कारण विचारले. बाईनी जवळ घेऊन विचारल्यावर तिच्या भावनांचा बांधच फुटला आणि ती ढसाढसा रडायला लागली.  तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. बाईनी तिला मनसोक्त रडू दिले.बाईनी विचार  केला,मनाचा निचरा व्हायलाच हवा. तो अश्रूवाटे होऊ दिला. ती थोडी शांत झाल्यावर बाईनी पुन्हा जवळ घेतले.बाईंनी आईच्या मायेनं वास्तपुस्त सुरू केली. डोळ्यातल्या अश्रूना आवर घालत तिने सांगितले,"बाई माझं लग्न ठरलं.... पण मला हे लग्न आताच नको... बाई,मला शिकायचंय.......!पुन्हा अश्रू अनावर..!बाईंच्या तर पायाखालची जमीनच सरकली. बाईनी तिला घट्ट आवळून पकडले. पण बाईना कुठं कळत होतं की,वाळू मुठीत नाही पकडता येत!एवढ्यात तासिका संपली पण बाईंचे विचारचक्र सुरू झाले. 
   बाईंना डोळ्यासमोर कोवळ्या मुलींचा घोळका दिसला. त्यात सगळ्या उमलू पाहणाऱ्या कळ्या....! अजून तारुण्याच्या उंबरठ्यापर्यंतही न पोचलेली पोरसवदा अवखळ पावले.....!त्या खेळणाऱ्या पायाना अजून स्थिरावण्याचही भान नाही...!पावलातला चंचलपणा अजून संपला नाही... आणि अशा नाजूक वयात या माझ्या पोरींच्या पायात  संसाराच्या बेड्या अडकणार ....??? ज्या हाताने अजून भातुकलीतील नवरा-नवरी सजवणं संपलं नव्हतं ती हातं संसाराचा गाढा ओढणार होती? बाई विचार करून करूनच थकल्या होत्या. 
     बाईनी थोडे मागे वळून पाहण्याचा विचार केला तेव्हा बाईना आठवला,तो यंदाचा शाळेतील पहिला दिवस!शाळेत परीपाठ सुरु होता. एक दिसायला सुंदर,उंचीपुरी,गव्हाळ रंगाची,मुद्दामहून नजर जावी असं नजरेत भरणारे सौंदर्य लाभलेली मुलगी समोर आली आणि तिने गाणे म्हटले. त्या गाण्याचे बोलही जशास तसे आठवले.... "बेटी हू मै बेटी,मै तारा बनूंगी,तारा बनूंगी मै सहारा बनूंगी....! रुपाप्रमाणे त्या मुलीचा आवाजही गोड होता आणि तितकाच आत्मविश्वास तिच्या गाण्यात होता. परीपाठ संपला. बाईनी त्या मुलीला थांबवून तिचे नाव विचारले. 'रोशनी' नाव सांगतानाही तिच्या डोळ्यात एक चमक होती. बाईना क्षणभर वाटले,पोरगी नावाप्रमाणेच मायबापाचे नाव नक्कीच रोशन करेल. पण त्यावेळी बाईना कुठं माहीत होतं,गरिबांच्या घरात जन्मलेले सौंदर्य हे शापित असते....! हीच ती रोशनी ,जिचे आज बालवयातच लग्न ठरले होते. 
     योगायोग असा होता,काही दिवसापूर्वीच बाईनी तिच्या गावात जाऊन एक महिला मेळावा घेतला होता. ग्रामीण भागातील महिलांचे परावलंबन पाहून त्या विषयाच्या संदर्भानेच  त्या बोलल्या होत्या. ग्रामीण भागात मुलींना घरातल्या लहान भावंडे सांभाळण्यासाठी अर्धवट सोडावे लागणारे शिक्षण,मुलींचे अल्पवयात होणारी लग्ने,त्याना वाढविण्यात पालकांकडून होणारा मुलामुलींचा भेद,अशा अनेक समस्यांवर त्या बोलल्या होत्या.  त्या श्रोत्यांमध्ये रोशनीचे आईबाबाही होते.पण त्याचा काहीही फायदा झाला  नव्हता. 
     आज शाळेतील रोशनीच्या घटनेवरून  बाईनी रोशनीच्या आईवडिलाना भेटायचे ठरविले.रोशनीचे घर एका दलित वस्तीत!ती घरे म्हणण्यापेक्षा राहण्यापुरता असलेला निवाराच तो!एक किंवा दोन खोल्यांची ती घरे!आजूबाजूला स्वच्छतेचा अभावच!चिखलात कमळ उगवावं,असं रोशनीच्या वस्तीकडे पाहिले की जाणवावं.  बाई तिच्या घरी गेल्या. आजूबाजूची लहान मोठी मुले मुली,त्यातील अशीच काही अर्धवट शिक्षण सोडलेली तर काही सध्या शाळेत असणारी!बऱ्याच जणाचे  आईवडील लेकरावर घराची जबाबदारी टाकून कामावर गेलेली.योगायोगाने रोशनीचे आईबाबा घरी भेटले. रोशनीच्या आईवडिलांशी संवाद साधला.
     बाईनी सरळ विषयालाच हात घातला. बाई बोलू लागल्या.'रोशनीचे लग्न एवढ्यातच का करताय?तुमची मुलगी हुशार आहे. तिची शिकण्याची इछा आहे. मुलगी दिसायलाही सुंदर आहे. तिला शिकू द्या. तुम्हाला पुढेही एकापेक्षा एक चांगला स्थळे तिच्यासाठी येतील.'
मध्येच बाईचे बोलणे तोडून तिची आई म्हणाली," बाई,तुमी सांगताया ते पटतया.आमची पोरगी रुपानं अन गुनानं सोनं हाय हे बी आमाला म्हाईत हाये. पर गरिबाच्या घरात रूपवान पोरगी मनजे पदरातला इस्तू हाय....."ती बोलत होती अन बाई शब्द न शब्द सुन्न मनाने ऐकत होत्या.
"बाई,आमाला पोट भरण्यासाठी दिसभर दोगा नवराबायकोला घराभाइर  जावं लागतंया.एवढी तरणीताठी पोर घरात ठिवून आमचा कामात जीव नाय लागायचा. जगात तर काय चाललय बगा की! लोकाइच्या वंगाळ वंगाळ नजरा पोरीला जगू नाय द्यायच्या. जरासी रुपानं कमी अस्ती तर आमालाबी एवडा घोर नवता. तुमचं भाशानं ऐकलया. पर बाई,तुमचे इचार आमच्या गरिबासाटी नाई हायेत. मोठ्याइच्या लेकरानं सिकावं. त्याइचे मायबाप दिसरात त्याइच्यासोबत ऱ्हायते. आमाला तर पोटापाण्यासाठी भाइर पडावच लागत्ये.अन बाई,पोरीला जास्ती सिकवूनबी काय फायदा?उद्या तेवडं सिकलेलं पोरगं हुडकायला आपल्याकडं तेवडा पैसाबी कुटाय? एकदाचं पोरीचे हात पिवळे केले की आपण मोकळे.....!" 
    विषण्ण मनाने बाई घरी परतल्या.मती गुंग झाली होती. याआधीही त्यांच्या शाळेत अशा अनेक अल्पवयीन मुलींच्या लग्नाचा विचार त्यांच्या पालकानी केलेला होता.शिकण्याची जिद्द असणाऱ्या मुलीनी ही तक्रार बाईंच्या कानावर घातल्यावर बाईनी त्यांच्या घरी जाऊन मुलींच्या  शिक्षणाची अनिवार्यता पटवून दिली होती. बऱ्याच पालकांचा हा निर्णय बदलविला सुध्दा होता. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. रोशनीच्या लग्नाचा फक्त विचार होत नव्हता तर साखरपुडा झालेला होता. गोष्ट हाताबाहेर गेलेली होती. बाई कायद्याचा आधारही घेऊ शकल्या असत्या.बाईनी विचार केला,कायद्याचा आधार घेतला तर या मुलीचे लग्न नक्कीच थांबेल.लग्न थांबेल पण रोशनी ज्या ज्या समाजात,वस्तीत राहते तिथे तिचे पुढचे आयुष्य कसे असेल?काय म्हणतील हे लोक?मुलीने शिक्षणासाठी लग्न मोडले,एवढे सामंजस्य असेल या लोकांत?की जनरितीप्रमाणे लग्न मोडलेली मुलगी म्हणून हिच्याकडे हीन नजरेने पाहतील?हिच्या गरीब आईवडिलांना हा समाज सुखाने जगू देईल?पुन्हा हिचे लग्न एवढ्याच सहजरितीने होईल?अशा अनेक विचारांचा भुंगा बाईंचे डोके पोखरून काढत  होता.  एकीकडे समाजाची संकुचित वृती तर दुसरीकडे रोशनीच्या जीवनाची चुरगळल्या जाणारी अबोल कळी...'तारा बनूंगी,सहारा बनूंगी ....' म्हणणाऱ्या रोशनीला तिच्या स्त्रीत्वाची हतबलता कळालीही नसेल.  अशा कित्येक कळ्या असतील ज्या उमलण्याआधीच गरीबीमुळे जागीच कोमेजून गेल्या असतील....!एकीकडे चंद्रावर जाणाऱ्या सुनीता,कल्पना तर दुसरीकडे अशा कितीतरी रोशनी ज्या की,स्वतःच्या जीवनातही प्रकाश आणण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या..... जीवनाचेही निर्णय  घेण्याचे स्वातंत्र्य नसणाऱ्या... पंखात खूप उंच उडण्याची जिद्द,क्षमता असूनही परिस्थितीने पंखच छाटलेल्या....!!!बाईंची हतबलता काही केल्या  संपत नव्हती....!!

★★★★★★★☆★★★★★★★★★★★★★★★
*वाचनातुन मिळते प्रेरणा*

 "ज्या दिवशी मंदिराकडे जाणाऱ्या रांगा वाचनालयाकडे वळतील,त्या दिवशी जगात भारत हा महासत्ता देश म्हणून ओळखल्या जाईल !" असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले यावरूनच आज वाचनालयाची स्थिती काय झाली असेल, हे कळते. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. सगळे जग एका मुठीमध्ये सामावलं आहे. जे हवे ते पुस्तक आज इ लायब्ररीमध्ये वाचायला मिळते त्यामुळे आज वाचनालये पुस्तकांचे फक्त देखाव्याचे ठिकाण उरले आहे की काय असे वाटते. खरंतर माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणजे वाचनालय होय. थोरामोठ्यांच्या जीवनाच्या रोपट्यांना ग्रंथानीच पाणी घालून आदर्श जीवनाचे वटवृक्ष बनविले आहेत. भगतसिंग सारख्या क्रांतिकारकाने तुरुंगात पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून अन्नत्याग करुन उपोषण केले होते. महात्मा फुले म्हणतात, त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली ती 'राइट्स ऑफ मॅन' या ग्रंथामुळे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाला कलाटणी देणारा ग्रंथ होता ,'बुध्दचरित्र' ! आज यांची  चरित्रे आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. हीच ज्ञानाची आगारे आज ओस आहेत, दुर्लक्षित ठरले आहेत. आजची तरुण पिढी ही वाचनापासून दूर गेली आहे. हातात मोबाइलसारखे तंत्रज्ञान आले आणि ज्या ग्रंथालयांना पूर्वी ज्ञानाची भांडार म्हणून ख्याती मिळाली होती, तीच ग्रंथालये आज एकाकी अवस्थेत आहेत.
       ग्रंथाचे व ग्रंथालयाचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. भारतीय स्वातंत्र्याची बीजे  ग्रंथातूनच देशभक्तांच्या मनात रुजविल्या गेली होती. त्याच बीजांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची स्फुल्लिंग चेतविली होती. देशभक्ती, देशनिष्ठेसारख्या भावना चेतविण्याचे काम त्याकाळी ग्रंथानीच केले होते. म्हणूनच भारताचा स्वातंत्र्यसूर्य असो अथवा दलित वस्तीवरचा सूर्योदय असो किंवा स्त्री जीवनातील सूर्योदय असो, हे स्वातंत्र्याचे तेज पसरविण्याचे काम हे ग्रंथानीच केले होते. म्हणून मला ही ग्रंथालय म्हणजे मानवी जीवनाच्या उध्दाराचा एकमेव महामार्ग वाटतो.  
        तंत्रज्ञानाच्या युगात आपण काय हरवत चाललोय हे, आजच्या पिढीला कळेनासे झाले. कारण त्याना वाचनालयापर्यंत चालण्याचे श्रम घ्यावे वाटत नाहीत. बरीच मंडळी मोबाईल, लैपटॉप, किंवा कंप्यूटरवर वाचन करतात. पण कंप्यूटरवर किंवा मोबाईलवर पुस्तके वाचनाने त्याच्या मान, पाठ, डोळे यावर किती दुष्परिणाम होताहेत, हे लक्षात येत नाही आहे. वाचनालयामध्ये जाणारे माणसे एकमेकांशी मिळूनमिसळून वागत असत, त्यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण होत असे. पण आज फक्त वाचनसंस्कृतीच नष्ट होत आहे, एवढेच नसून माणसामाणसातील अंतर वाढत जात आहे. वाचनातून होणाऱ्या संस्कारांना ओहोटी लागली आहे. या अवांतर वाचनाची जागा आजच्या तरूणमंडळीत व्हाट्सॅप, फेसबुक, ट्विटर,आणि विडीओ गेम्सनी घेतली आहे. ज्याना आदर्श मानावे अशी थोरामोठ्यांची चरित्रे आज वाचनालयात धूळ खात पडली आहेत.
       नुकतेच माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून  अख्ख्या देशभर साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी या दिनानिमित्त डॉ. ए.पी. जे. अब्दूल कलाम यांची प्रेरणादायी पुस्तके वाचून जीवनात वाचनाची तसेच उत्तूंग चरित्रे असणाऱ्या नेत्यांची पुस्तके वाचून प्रेरणा घ्यावी,यासाठी हा दिन साजरा करण्यात आला. हा  वाचन  प्रेरणा दिन असला तरी दररोज  अवांतर वाचन करुन हा वाचन सप्ताह साजरा करायचा आहे. जेणे करुन मुलांना वाचनाची गोडी लागावी. थोरामोठ्यांच्या चरित्रातून त्यानी प्रेरणा घेऊन आपले चरित्र आदर्श बनवावे.
    तसेच ग्रंथालयाची गरज जास्त ग्रामीण भागात आहे. गावागावात ग्रंथालये उपल्ब्ध व्हावीत. जेणेकरून ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठीच्या तयारीसाठी शहरात येऊन रहाण्याची गरज पडू नये. वृध्दांचा जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयात जावा. तेथील महिलांसाठी महान स्त्रियांचे चरित्रे वाचण्यास उपलब्ध व्हावीत. ज्यातून त्याही स्त्रियांना जीवन जगण्यासाठी  वेगळी दिशा मिळेल. शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीविषयक माहिती देणारी पुस्तके, मनोबल वाढविणारी पुस्तके तिथे उपलब्ध व्हावीत. आधुनिक तंत्रज्ञानाचा जेथे उपयोग घेणे अनिवार्य आहे, तिथे घेतलाच पाहिजे, पण ज्या बाबी सहज उपलब्ध होऊ शकतात तिथे तो वापर टाळलाच पाहिजे. कारण या तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे असतात,तेवढेच ते घातकही असतात. त्याच्या अतिरिक्त  वापराने मान, पाठ, डोळे यावर विपरीत परिणाम होतो,हे सर्वज्ञात आहे. परंतु पुस्तके वाचनाने कोणताही विपरीत परिणाम होत नाही. म्हणूनही आणि काळाची गरज ओळखूनही आपली पावले ग्रंथालयाकडे वळायला हवीत. मग नक्कीच वाचन आपणास प्रेरणा देत राहील आणि आपले जीवन ही सफल होईल असे वाटते.

- सौ. संगीता देशमुख,
  वसमत जि. हिंगोली
 09975704311



No comments:

Post a Comment