Saturday, 11 June 2016

नागोराव सा. येवतीकर



शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर.......

भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषीप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा विकास अवलंबून आहे. भारतातील शेतकरी शेतात मरमर करतो आणि लोकांना लागणाऱ्या अन्नधान्याची उत्पन्न काढतो, शेतात तो राबतो, कष्टतो, कधीही आळस करीत नाही, खुप काम करतो, आपल्या जीवाचे रान करतो पण त्याला क्षणाचेही सुख मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. इतरांना जगवणारा, उत्पादक असा शेतकरी मात्र फारच बिकट अवस्थेत दिसून येतो. कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळीनुसार शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे. मात्र त्याच्याच पदरात धोंडा का पडतो? हे एक न सुटणारे कोडे आहे. जगाचे पालनपोषण करणारा शेतकरी मात्र महागाईच्या आगीत होरपळून निघत आहे. कर्जाच्या डोंगराखाली दबला जात आहे. शेतातील उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी जवळ माल असला की त्याचे भाव राहत नाही आणि ज्यावेळी व्यापाराकडे असतो त्यावेळी मात्र मालाचे भाव गगनाला जाऊन भिडतात. हे एकावेळी घडते असे नाही दर वेळी असेच घडते.म्हणजे शेतातील उत्पादनावर व्यापार करणारी मंडळी महालातील पंख्याखाली बसून भरपूर पैसा कमावित आहेत आणि शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करणारा शेतकरी मात्र हलाखीचे व दुःखाचे जीवन जगत आहे.
शेतकरी मंडळींना ना निसर्गाची साथ आहे ना सरकारची, त्यामुळे त्यांच्या पदरात दरवर्षी निराशाच येते. पावसाळा आला की, नव्या दमाने, नव्या उत्साहाने तो कामाला लागतो. मात्र त्याच्या उत्साहावर निसर्ग कायम पाणी टाकतो. वेळेवर पावसाचे पाणी पडत नाही मात्र केलेल्या कामावर पाणी टाकायला विसरत नाही. शेतातून निघणा-या उत्पादनांवर भरवसा ठेवून शेतकरी आपले कौटुंबिक व्यवहार पूर्ण करतो आणि ऐनवेळी निसर्गाकडून त्यास फटका बसतो. त्यामुळे त्याच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत जातात व एक दिवस अशी परिस्थिती येते की, शेतक-यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच दिसत नाही. एका वर्षात कोणत्या भागात किती शेतक-यांनी आत्महत्या केल्या ? रोजचे वृत्तपत्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातमी शिवाय अपूर्ण आहे की काय असे वाटते. एका वर्षात कोणत्या विभागातील किती शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या याचा लेखाजोखा महत्त्वाचे नसून महत्त्वाचे आहे ते शेतकरी आत्महत्या का करतो ?

निसर्गाची साथ - भारतात प्रामुख्याने दोन प्रकारची शेती केली जाते. एक म्हणजे जिरायती अर्थात कोरडवाहू आणि दुसरी बागायती. देशात दुस-या प्रकारापेक्षा पहिल्या प्रकाराची शेती करणा-यांची संख्या जास्त आहे. निसर्गावर आधारित शेती करावी लागते, त्यामुळे त्याचे जीवन बेभरवशाचे असते. शेतकरी पै-पै गोळा करून बी-बियाणे, खते व औषधी खरेदी करतो आणि शेतात टाकतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे एक तर त्याला आकाशाकडे डोळे लावून बसावे लागते किंवा अति पावसामुळे पाऊस थांबण्याची वाट पाहावी लागते. काही का असेना फटका मात्र शेतक-यांनाच बसतो. सध्या तरी कोरडवाहू शेती करणे म्हणजे एक जुगारच आहे. लागली लॉटरी तर लागूनच जाते अन्यथा बरबादच. नशिबाने साथ दिली तरच शेतात टाकलेले बी-बियाणे, खते, औषधे आणि श्रम यांना फळ मिळते. नाही तर खर्च झालेली मुद्दल रक्कमसुद्धा त्यास परत मिळत नाही. शेतक-यांसोबत दरवर्षी असेच घडते. त्यामुळे त्याच्या पदरात नेहमीच निराशा पडते.
शेतक-याचे जीवनमान, त्याचा जीवन जगण्याचा स्तर उंचवायचा असेल तर सर्वप्रथम त्याची शेती निसर्गावर अवलंबून राहू नये अशी परिस्थिती निर्माण करावी. निसर्गाचा लहरीपणा निर्माण केला आपणच आणि त्यास अटकाव करण्याची जबाबदारी आपणावरच आहे. पाऊस पडणे वा न पडणे हे सरकारच्या हाती नाही. पाण्याचे योग्य नियोजन करणे, वृक्षलागवड करून वृक्षसंवर्धन करणे इत्यादी साधे उपाय करणे आवश्यक आहे. वृक्षांमुळे पाऊस पडतो हे आता सर्वज्ञात झाले आहे. उघड्या जागेवर, माळरानावर, टेकड्यांवर जास्तीत जास्त वृक्ष कसे जगविता येतील याचा प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे. निसर्गाची शोभा व पर्यावरण संतुलन कसे राखता येईल यावर विचार झाला पाहिजे.

शेतक-यांच्या उत्पादनाला हमी भाव
शेतकरी जीवनावश्यक अशा अनेक अन्नघटकांचे उत्पादन करतो. संसार चालविण्यासाठी पैशाची आवश्यकता भासते त्यामुळे तो आपला उत्पादित माल बाजारपेठेत विक्रीसाठी आणतो. मात्र बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याच्या गणितात शेतक-यांना नेहमीच फटका बसतो. जेव्हा शेतक-याजवळ शेतमाल असतो त्यावेळी बाजारात भाव कमी असतो आणि व्यापारी मात्र साठवणूक करून चढ्या भावाने विक्री करतात. दरवाढीचा खरा फायदा शेतक-यांना होण्याऐवजी तो दलालांना व व्यापा-यांनाच जास्त होतो. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन करणारा पोशिंदा कंगाल बनत चालला आहे तर त्याच्या उत्पादनावर जगणारी बांडगुळे श्रीमंत होत आहेत. तेव्हा शासनाने या प्रश्नाविषयी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. बाजारपेठेत व्यापारी वा दलाल लोकांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी प्रत्येक शेतक-याला आपला उत्पादित माल साठविता येईल अशा शीतगृह कोठारांची गावोगावी निर्मिती करावी. मध्यस्थाच्या मदतीने चालणारा व्यवहार बंद करून शेतक-यांच्या प्रत्येक उत्पादित मालाचे शासनाने हमी भाव अगोदरच जाहीर केल्यास शेतक-यांची लूट होणार नाही. उत्पादित मालाची नोंदणी शेतक-यांच्या नावे करण्यात यावी ज्यामुळे शेतकरी विक्री करताना तूरडाळीची किंमत ३५ रु. प्रति किलो आणि व्यापारी विक्री करताना ८० रु. तर या वाढीव रकमेतून निदान ५० टक्के रक्कम शेतक-यांना मिळावी असा कायदा तयार केल्यास शेतक-यांचा नक्कीच फायदा होईल. शेतक-याच्या हातून एकदा माल गेला की त्यावर त्याचे कसल्याच प्रकारचे नियंत्रण नसते.बाजारात सध्या असलेली ही विषमता दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाजारपेठेतील शेतक-यांच्या उत्पादित मालाचे सर्व व्यवहार कृषि उत्पन्न बाजार समितीमार्फतच व्हावेत. बाजारपेठेत शेतक-यांच्या मालाची बोली लावण्याची पद्धत सर्वप्रथम बंद करावी. उत्पादित मालाला वेगवेगळ्या प्रकारची नावे ठेवून दलाल मंडळी एकाच प्रकारच्या उत्पादनाला दर तासाला किंवा दिवसागणिक वेगळेच भाव लावतात. अशा या लिलाव प्रक्रियेमुळे शेतकरी हवालदिल होतो. त्याऐवजी स्थिर भावात खरेदी-विक्री झाल्यास शेतक-यांना आपल्या उत्पादित मालाविषयी विश्वास वाटतो. व्यापारी किंवा दलाल मंडळींना फाटा देऊन ज्याप्रकारे पणन महासंघ कापूस खरेदी करते त्याच धर्तीवर सर्व उत्पादित माल जसे की, तूर, मूग, उडीद, सोयाबीन इत्यादी सर्व वस्तू शासनाने खरेदी कराव्या व एकच हमीभाव जाहीर करावा म्हणजे शेतकरी विश्वासपूर्वक जगू शकेल.

जोडधंदा करण्यासाठी अनुदान द्यावे 
शेतीला पूरक असा जोडधंदा असेल तर शेतातून झालेले नुकसान या व्यवसायातून भरपाई करता येऊ शकते. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश किंवा कोकण विभागातील शेतकरी शेती या मुख्य व्यवसायासोबत पशुपालन, शेळीपालन किंवा इतर जोड व्यवसाय करतो. ज्यामुळे त्याला आर्थिक चणचण भासत नाही किंवा ऐनवेळी कोणाकडे जावे लागत नाही. याच जोडधंद्याची उणीव मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागात दिसून येते. येथील शेतक-यांची नुकसानभरपाई कोणत्याच मार्गाने होत नाही.
२०-२५ वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या घरी एक तरी दुभते जनावर असायचे ज्यामुळे दूध त मिळतच होते शिवाय दुग्धजन्य पदार्थही घरीच मिळत होते. त्याचसोबत जनावरेही वाढत होती. मात्र ५-१० वर्षांपासून जनावरांची संख्या कमी झाली. जेथे दुधाची गंगा वाहात होती तेथील लोकांना चहासाठी जेवढे दूध लागते तेवढ्या दुधासाठी मोताद होण्याची वेळ आली. एवढी विपरीत स्थिती का निर्माण झाली? शासनाने वेळीच यावर उपाययोजना आखली नाही. शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी केली. याने आत्महत्या थांबल्या का? नाही. उलट वाढतच गेल्या. याव्यतिरिक्त शासनाने प्रत्येक शेतक-याला पशुपालन, शेळीपालन वा इतर जोड व्यवसाय उभारणीसाठी सबसिडीच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात रक्कम दिली असती तर लाखो शेतक-यांच्या हाताला काम मिळाले असते, गावात समृद्धता वाढली असती. शेतक-यांची नुकसानभरपाई झाली असती, त्याचसोबत धवलक्रांतीही घडली असती. काही लघुउद्योगांसाठी जरी कर्जपुरवठा झाला असता तर त्याच्या मानसिकतेत बदल झाला असता. परंतु कर्जमाफी करून शेतक-यांना आळशी बनविले.
फुकट मिळालेल्या पैशातून दारू, जुगार या बाबींवर खर्च करणा-यांची संख्या कमी नाही. एक प्रकारे शासनाने लोकांना फुकट जगविण्याचा जणू विडा उचलला आहे असे दिसते. नुकतेच पारित करण्यात आलेले अन्न सुरक्षा विधेयक २०१३ मधून एक चित्र ठळकपणे दिसत आहे. भविष्यात शेतकरीवर्गास शेतात काम करण्यासाठी जे काही मजूर लागतील ते अव्वाच्या सव्वा दरात मिळवावे लागतील आणि कदाचित मजूर मिळणारही नाहीत. कारण या विधेयकानुसार देशातील अर्ध्या जनतेला कमी दरात अन्नधान्य मिळत असेल तर ते काम का करतील? आज अंत्योदय योजनेतून जे सूक्ष्म चित्र दिसत आहे या योजनेतून अगदी ठळक दिसेल. यापेक्षा शासनाने शेतक-यांच्या उत्पादित मालाला संरक्षण व हमी भाव दिला असता तर फार बरे झाले असते.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
   9423625769
  nagorao26@gmail.com
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नाव : नागोराव सायन्ना येवतीकर 
टोपणनाव : नासा 
जन्मदिनांक : 26 एप्रिल 1976
अवगत भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि तेलगु 
दहावी : 1993 मध्ये विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण 
बारावी : 1995 मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 
डी. एड. : 1997 मध्ये द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण 
नौकरी आरंभ दिनांक : 12 ऑगस्ट 1998
छंद : शालेय जीवनात क्रिकेट खेळण्याचा तर तारुण्यात वाचन व लेखनाची आवड 
इयत्ता दहावीत असताना वृत्तपत्रात माझा पहिला लेख प्रकाशित झाला. त्याच प्रेरणेवरुन आजपर्यंत लेखन प्रवास चालू आहे. राज्यांतील विविध मासिक, साप्ताहिक, आणि दैनिकातून विविध विषयावर वैचारिक लेख प्रकाशित. दै. सकाळ, दै. लोकमत आणि दै. देशोन्नती मध्ये लहान मुलांसाठी विविध कोडे प्रकाशित झाले आहेत. 
माझी वाटचाल - मी पुरस्कार मिळविण्यासाठी कधी कार्य केले नाही. परंतु जे काही पुरस्कार माझ्या जीवनात मिळाले त्यामुळे मला अजून प्रेरणा मिळाली आणि मी अधिक जोमाने काम करू लागलो. 
2007 - अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ मुंबई यांचेकडून राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रसिद्ध लेखिका श्रीमती विजया वाड यांच्या हस्ते प्रदान 
1996 - मुंबई नागरिक नशाबंदी सप्ताह समिती कडून पोस्ट कार्ड स्पर्धा गुणगौरवार्थ प्रमाणपत्र महात्मा गांधीजी च्या जयंती निमित्त देण्यात आले 
2009 - जीवन शिक्षण प्रणाली तर्फे आयोजीत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सहभाग 
2008 - महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून आयोजित जीवन शिक्षण लेखन कार्यशाळेत नांदेड जिल्ह्यातून सहभाग. 
2009 - जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त नांदेडच्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या विषयी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते प्रदान 
जानेवारी 2000 - महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्था राज्य साधन केंद्र औरंगाबाद साहित्य निर्मिती विभागाकडुन अंबाजोगाई येथील राज्यस्तरीय लेखक शिबिरात सहभाग 
सप्टेंबर 2000 - महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्था राज्य साधन केंद्र औरंगाबाद साहित्य निर्मिती विभागाकडुन उदगीर येथील नवसाक्षर साहित्य निर्मिती शिबिरात सहभाग 
डिसेंबर 2014 - पंचायत समिती धर्माबाद कडून गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मान 
जानेवारी 2015 - घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत पहिल्या 100 त स्थान मिळाल्यामुळे 2000 रू. ची ग्रंथ भेट 
ऑगस्ट 2005 - जिल्हा स्तरीय साधनव्यक्ती म्हणून पर्यावरण व नवोपक्रम शिक्षक यावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. 
ऑक्टोबर 2015 - डॉ. A P J अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस 
नोव्हेंबर 2015 - शाळेत विद्यार्थ्याना सोपे वाटावे म्हणून राबविलेला उपक्रम जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवीत राज्यस्तरासाठी निवड 

कवितेत व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न 

......... *खंत* ...........
( शाळा शिकणाऱ्या मुलीची )
मला पण खूप
शिकावसं वाटतं
आई-बाबांची सेवा
करावसं वाटतं
पण................

नाना समस्या 
नाना अडचणी
समोर येतात 
उभ्या जीवनी

शेतीकामात मदत 
ही करावचं लागतं
लहान भावंड ही
सांभाळावच लागतं

घरकाम करुन चूल
पेटवावच लागते
एवढं सगळ करुन
अभ्यास कुठे होते ?

शेतात करावी मजूरी 
तेंव्हाच मिळते भाकरी 
पैसा काही उरत नाही
खर्च होतात सारी
म्हणून ................

स्वप्नातील रंगीन 
चित्र सारे मिटवले
चूल अन मुलाची
फक्त भागीदार झाले.

( मुलींना कितीही शिक्षण दिले तरी घरोघरी जवळपास हे चित्र दिसून येते. स्त्री जागर झाला आणि स्त्री सुशिक्षित सुध्दा झाली. पण त्याची टक्केवारी फार कमी आहे. )

- नासा येवतीकर

जन्मत: दिसतो आईचा चेहरा
जन्मभर असतो तिचाच सहारा

ओळख होते नंतर जनकाची
शपथ घेतो कन्यादानाची

मग येतो भाऊ जीवनात
बांधल्या जातो रक्षा बंधनात

साथी बनूनी येतो नवरा
हुंडयापायी घालवितो चकरा

सासरचे करी पैश्यासाठी छळ
आत्महत्येने मी काढते पळ

आई, बहीण वा असो सन्मानी
हेच आहे स्त्री जन्माची कहाणी

- नासा येवतीकर

घर कहाणी 

ही माझी आई 
तिला कामाची घाई 
कामाला ठेवली बाई 
ती वेळेवर न येई 

हा आमचा साई 
झोप आवडे लई 
अभ्यास तसाच राही 
शाळेत मार खाई 

ही आमची  ताई 
खोड्या करते लई 
शाळेत मात्र कशी 
गुमान बसून राही

बाबा करतो कमाई 
घर सांभाळते आई
आमच्या कुटुंबाची 
आहे अशी कहाणी 

✏ नासा

 मंद चद्रांच्या प्रकाशात
 घेऊ गोड स्वाद दुधाचा...
 विश्वास वाढवू नात्यातील
 गोडवा असु द्या मैत्रीचा

- नासा येवतीकर @ 26


★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
*स्वच्छतेचे महत्त्व*

                  - नागोराव सा. येवतीकर

स्वच्छता हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ह्या एका गुणा मुळे माणसाचे जीवन सुंदर बनते. ही एक सवय आहे. स्वच्छता म्हटली की आपल्या समोर अनेक बाबी उभ्या राहतात. स्वच्छता कश्याकश्याची आणि कशी ठेवायाची हा मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. स्वच्छतेची सुरुवात ही स्वतः पासून म्हणजे स्वतःच्या शरीर स्वच्छते पासून करावी. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या स्वच्छते विषयी आपण जागरूक राहून कार्य केल्यास आपली छाप इतरावर निश्चितपणे पडते. लहानपणी सकाळी उठले की आई मुलांच्या मागे राहून दात स्वच्छ घास, चूळ भर आणि हात-पाय स्वच्छ धुउन घेण्याविषयी तगादा लावते. कारण स्वतः च्या स्वच्छतेची सुरुवात ही याच क्रियेपासून होते. लहानपणी लागलेली स्वच्छतेची चांगली सवय त्यांच्या सोबत आयुष्यभर राहते ही तर चांगली गोष्ट आहेच यासोबत आपल्या दाताचे आयुष्यही वाढते. दाताचे विकार होत नाही. आपल्या जीवनात दाताचे काय महत्त्व आहे हे दात नसणाऱ्या लोकांना विचारून पहिल्याशिवाय कळणार नाही. स्नान करणे ही त्या नंतरची अत्यंत महत्वाची क्रिया. बहुतांश व्यक्ती स्नान ही क्रिया महादेवाला पाणी घातल्यासारखे डोक्यावरुन पाणी ओततात त्यामुळे अंगाची सफाई होत नाही. साबणाचा वापर करीत अंग घासुन स्नान केल्यास आपल्या अंगाचा वास येत नाही. विशेष म्हणजे त्वचा रोगापासून आपण दूर राहू शकतो. दररोज स्वच्छ कपडे परिधान करून बाहेर पडण्याची आपली सवय इतराना त्रासदायक ठरत नाही. मळके कपडे अंगावर असतील आणि प्रवासात कुठे तरी आपण बसलात तर कपड्याच्या दुर्गन्धी मुळे कुणी आपल्याजवळ बसत नाही. शाळेत तर याचा फार वेगळा अनुभव येतो. त्यामुळे घराबाहेर जाताना स्वच्छ कपडे एक तर आपणास शोभुन दिसते आणि आपल्यामुळे इतराना त्रास ही होत नाही. म्हणून स्वच्छ कपडे वापरण्याची सवय शाळेत असताना जी लागते ती आयुष्यभर सोबत राहते. बाहेरुन घरात येताना हात-पाय स्वच्छ धूउन घरात प्रवेश करावा. बहुतांश वेळा मुले बाहेर उघड्यावर खेळतात आणि तसेच घरात प्रवेश करतात. ज्यामुळे बाहेरील अनेक किटक थेट घरात प्रवेश मिळवितात आणि घरातील अनेक लोक आजारी पडतात. शौचास जाऊन आल्यावर सुद्धा स्वच्छ हात-पाय धुवावे आणि मगच घरात यावे. जेवण करण्यापूर्वी हात अगदी स्वच्छ धुवावे आणि कोरड्या रुमालाने साफ करावे. रात्री झोपण्या पूर्वी सुद्धा स्वच्छ हात-पाय धुतल्या नंतर छान झोप लागते की नाही ते पहा. म्हणजे स्वतः ची स्वच्छता ही जीवनात अत्यंत महत्वाचे आहे. याशिवाय आपले जीवन दीर्घायुष्य होउच शकत नाही. अस्वच्छ रहाणे म्हणजे आपले अर्धे आयुष्य कमी करून घेण्यासारखे आहे. त्याच अनुषंगाने नुकतेच आपण जागतिक हात धुण्याचा दिवस साजरा केला आहे. त्यातून आपणास हाच संदेश मिळतो की स्वच्छ रहा ; निरोगी रहा.
स्वतःच्या स्वच्छतेनंतर आपण आपल्या घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देतो आणि ते आवश्यक आहे. कारण आपले ज्याठिकाणी उठणे, बसणे, खाणे, आणि पिणे असते त्या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे आहे. त्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी आपले घर झाड़ूने साफ करीत असतो. आपले अंगण स्वच्छ करतो. घरातील आणि अंगणातील कचरा परिसरात टाकतो. म्हणजे आपणास परिसर घाण असलेले चालते परंतु आपले घर आणि अंगण स्वच्छ असावे असे वाटते ही प्रत्येकाची मानसिकता आहे. हा बदल करण्यासाठी स्वच्छतेचे धडे किंवा पाठ आज समाजाला शिकविण्याची खरी गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे हे चुकीचे आहे हे कळतय पण वळत नाही अशी स्थिती झाली आहे. 
आज ग्रामीण भागात जर गेलो तर गावाच्या प्रवेशालाच दुर्गन्धी सुरु होते. प्रत्येक जण उघड्यावर शौचास जाउन गावाचा प्रवेशाचा संपूर्ण रस्ता अस्वच्छ करतात. यात कधी बदल होणार आहे ? गावात असलेली शाळा आपणास कधीच स्वच्छ ठेवता येत नाही. शाळा सुटली की गावातले काही रिकामटेकडे पोरे शाळेत येऊन वर्ग खोल्याच्या भिंती खराब करतात. काही गुटखा शौकीन मुले पान तंबाखू खातात आणि सर्व परिसर कधी कधी भिंती रंगवून टाकतात. दारू पिणारे मंडळी दारू पितात आणि वर्ग खोलीत बाटली फेकतात तर काही जण बाटली मैदानावर टाकतात, अश्या रीतीने सकाळी स्वच्छ केलेला शाळेचा परिसर सायंकाळी घाण केल्या जातो. शालेय स्वच्छालय कोणत्याच गावात चांगली ठेवली जात नाहीत. ज्या गावात शालेय स्वच्छालयाची देखभाल स्वतः गावकरी करीत असतील त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते. गावात इतर काही ठिकाणी सुध्दा ही मंडळी अस्वच्छता पसरवितात. ज्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरते. त्यामुळे गावात साथीचे अनेक रोग पसरतात. मग दवाखाना आपल्या मागे लागते. जेथे लाखो रुपये खर्च करावे लागते तरी आपले डोळे उघडत नाही आणि आपला गांव स्वच्छ ठेवत नाही. डेंग्यू सारखा आजार तर कधी कधी आपला जीव ही घेतो. हा रोगप्रसार फक्त आणि फक्त आपल्या अस्वच्छतेमुळे होते याची जाणीव आपणास व्हायला हवी. ग्रामपंचायत कार्यालय जमेल तेवढे कार्य करते पण संपूर्णपणे त्यावर अवलंबून रहाणे हे ही चूक आहे. वैयक्तिक स्वच्छते सोबत गावाची स्वच्छता देखील तेवढीच महत्वाची आहे.
सार्वजनिक ठिकाणी आपली वागणूक चांगली असेल तर परिसर स्वच्छ राहू शकते. बरेच जण सार्वजानिक ठिकाणी बेजबाबदरपणे वागतात आणि त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरत जाते. राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये प्रवास करताना असा अनुभव खास करून येतो. बसमध्ये प्रवास करणारे काही मंडळी पान तंबाखू आणि गुटखा खाऊन कोपऱ्यात थुंकुन सर्व जागा घाण करतात. त्यामुळे इतर प्रवाश्याना त्याचा त्रास होतो. धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे ह्या फलक ऐवजी कोपऱ्यात थुंकू नका असे फलक लावावे लागेल असे वाटते. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ करणाऱ्या व्यक्तिस दंड लावण्याचा कायदा अस्तित्वात आहे मात्र फक्त तो कागदावरच आहे. त्याची अंमलबजावणी जर करण्यात आली आणि दंड लावण्याची प्रक्रिया चालू केल्यास अस्वच्छता कमी होईल, असे वाटते. बसनंतर सर्वात जास्त प्रवासी वाहून नेणारे रेल्वेमध्ये स्वच्छता दिसणे खूपच दुरापास्त आहे. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवणारे नागरिक रेल्वेत मात्र सर्व काही विसरून वागतात. जेथे काही खाल्ली तेथेच कचरा करतात. ज्याचा त्रास इतर प्रवाश्याना होतो. कधी कधी त्याचे बळी आपणच ठरतो हे ही सत्यच आहे. बागेत सुध्दा आपली हीच बेफिकिर वृत्ती दिसून येते. पर्यटननाच्या स्थळी सुध्दा आपण स्वच्छ वागतो असे काही दिसून येत नाही. त्यामुळे बस आणि रेल्वेमधील स्वच्छता असो वा इतर ठिकाणची स्वच्छता ही आपल्या हातात आहे. ती आपली सर्वाची मालमत्ता आहे अशी काळजी घ्यावी. आपण एकटे स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करू या आपल्या सोबत एक-दोन व्यक्ति तरी निश्चितपणे या मार्गावर येतात. महात्मा गांधीजी यांनी ज्याप्रकारे आपल्या जीवनात स्वच्छतेला महत्त्व दिले होते. तसे आपण ही महत्त्व देऊ या. स्वच्छ भारत निर्माण करण्यात आपले ही काही योगदान देऊ या.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769
nagorao26@gmail.com

★★★★★★◆◆◆◆◆◆★★★★★★★★

 *जीवन सुंदर आहे* ......

"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" हे रेडियो वरील गाणे ऐकत असतानाच एक बातमी वाचण्यात आली. एका वीस वर्षीय युवतीने नदीत उडी मारुन आत्महत्या केली. त्या बातमीने रेडियो वरील गाण्याचे माझे लक्ष पार उडून गेले आणि त्या मुलीच्या अश्या कृतीने तिच्या आई-बाबावर आणि त्या परिवारावर काय प्रसंग ओढवाले असेल याची साधी कल्पना जरी केली तरी ह्रदय धडधड करायला लागले, छातीचे ठोके वाढले. नेमके आयुष्याला आत्ता सुरुवात होऊ लागली होती आणि तिने आपल्या हाताने आपले आयुष्य नष्ट करून टाकली. 
जीवन सुंदर आहे ते जगता आले पाहिजे असाच काहीसा संदेश त्या गितातून देण्याचा कवीचा प्रयत्न आहे. आपण जीवन जगण्याचा कधीही मनातून प्रयत्न करीत नाही. आपण आपली जीवन क्रिया समजून घेतली नाही त्यामुळे त्याचा त्रास आपणास नक्की होतोच. त्यासाठी सर्व प्रथम आपण आपल्या परीने आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्नच करायला हवा. फार लवकर हताश होणे, नाराज होणे यामुळे मनात नैराश्य निर्माण होते. मग आपले विचार एका वेगळ्याच दिशेने धाव घेते. मनात न्यूनगंड निर्माण होते. त्या मुलीला घरात काही त्रास होता का ? नव्हता ? हे प्रश्न महत्वाचे नाही तर या टोकापर्यंत ती का गेली ? याचा ही विचार केला पाहिजे. वास्तविक पाहता अश्या घटना सहजासहजी किंवा एका क्षणी घडलेल्या नसतात तर खुप दिवसापासून त्यांच्या मनात याची सल बोचत असते. वारंवार त्याच विषयावर चिंतन करून मन बधीर होत राहते आणि असे पाऊल उचलले जाते.
त्यामुळे कुटुंबात वादविवाद, भांडण असे प्रकार शक्यतो होऊ देऊ नये. घरातील सर्वाशी प्रेमाने वागत रहावे शक्यतो या गोष्टी पाळले तर असे प्रकार होत नाहीत. मुलींनी सुद्धा फार लहान गोष्टी मनावर न घेता सामंजस्यपणाने विचार करून परिवारामध्ये आंनदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. मग पहा खरोखरच जीवन सुंदर असल्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

*आत्महत्या हा पर्याय नाही*

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्या समाजात असलेली एक मोठी समस्या बनून पुढे येऊ पाहत आहे. सरसरी दररोज तीन शेतकरी विविध कारणामुळे मृत्यूला जवळ करीत आहेत. शेतकऱ्यांना निसर्गाची ही साथ मिळत नाही ना सरकारची साथ यामुळे तो समस्याग्रस्त बनत चालला आहे आणि त्याच विवंचणेत आत्महत्या शिवाय दूसरा पर्याय त्याला सुचेना झाले. यावर्षी शेतात भरघोस पीक येईल आणि डोक्यावर असलेले कर्ज संपून जाईल या विचारात दरवर्षी नव्या उमेदीने तो शेतात राबतो पण त्यांच्या कपाळी सुख लिहिलेले नाही तर कसे सुख मिळणार ? घरात खाणारी तोंडे जास्त आणि कमविणारा मात्र तो एकटा त्यामुळे घराचा पूर्ण भार त्याच्यावर असणार हे ठरलेले आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी त्यांना कुटुंबातील, परिवारातील आणि मित्राचा आधार असायला हवे. आज ना उद्या समस्या संपतील या आशेवर जगणे आवश्यक आहे, मात्र चिंता ही स्वस्थ बसू देत नाही. पण खरोखर आपण आत्महत्या केली आणि आपले जीवन संपविले तर आपल्या समोर ज्या काही समस्या होत्या त्यापासून आपली कायमची सुटका होईल मात्र त्याच समस्या आपल्या कुटुंबातील आणि परिवारातील सदस्यना अजून गंभीर स्वरुपात भेडसावते याचा एक वेळ विचार केलाय का ? नाही. जीवनातील कोणत्याही समस्यावर आत्महत्या किंवा जीवन संपविने हा पर्याय होऊच शकत नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या डोक्यावरील कर्जाचा किंवा शेतातील नापिकीचा जास्त डोक्यात न घेता काम करीत रहा. भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं ही गोष्ट लक्षात ठेवा.
जीवन खूप सुंदर आहे, त्याला फक्त योग्य दिशेने चालण्याचा प्रयत्न करीत रहावे. फक्त शेती न करता त्यासोबत काही लघू उद्योग करता येईल काय याचाही विचार करून तसा जोड व्यवसाय केल्यास आपल्या जीवनाला नक्कीच उभारी मिळेल. आज दुधाचा व्यवसाय करणारी शेतकरी मंडळी झालेला नुकसान दुसऱ्या व्यवसायतुन भरून काढू शकतात आणि त्यासाठी आपणास काही वेगळी प्रक्रिया करावे लागत नाही. शेळीपालन व्यवसाय ही आपणाला अगदी सहजपणे करता येईल त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. असे काही व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्यांनी विचार केल्यास हे जीवन किती सुंदर आहे याची प्रचिती येईल.

*परिक्षेपेक्षा जीवन महत्वाचे*

विद्यार्थ्याच्या जीवनातील एक महत्वाचा भाग म्हणजे परीक्षेत मिळविलेले यश. त्यासाठी तो वर्षभर जीव तोडून रात्रंदिवस अभ्यास करतो आणि केलेल्या अभ्यासाची दोन किंवा तीन तासात आपली स्मरणशक्ती पणाला लावून परीक्षा द्यायची. ती परीक्षा चांगली झाली तर विद्यार्थी खुश राहतो आणि तीच परीक्षा थोडी अवघड किंवा कठीण गेली असे वाटले की मुले नाराज होतात. त्यांचे कुठेही मन लागत नाही. निकाल लागण्यापूर्वीच "पेपर अवघड गेला म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यांने केली आत्महत्या" अशी बातमी वृत्तपत्रात वाचायला मिळते. ज्या आई-बाबा नी मग ते गरीब असो श्रीमंत त्यांनी आपल्या भविष्याचा आधार म्हणून आपणास पालन पोषण केले आहे आणि एवढं शिक्षण पण दिले आहे. मी जर आत्महत्या केली तर माझ्या आई-बाबावर काय बितेल ? त्यांचे हाल कसे होतील ? आई-बाबा क्षणभरा साठी रागावतात कारण आपली मुले वाइट मार्गाला जाऊ नये, मुलांचे भविष्य उज्जवल व्हावे यासाठी प्रत्येक पालक धडपड करीत असतो. गरीब आई-बाबा तर आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या शिक्षणावर पैसा खर्च करतात. फाटक के कापड वापरतात मात्र मुलांना सर्व हवे नाही ते बघतात. तेंव्हा खरोखरच विद्यार्थ्यांनी परिक्षेचा पेपर अवघड गेला किंवा परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून जीवन संपविणे योग्य आहे का ? याचा प्रत्येक विद्यार्थ्यांने विचार करणे आवश्यक आहे.
दहावी आणि बारावीची परीक्षा जीवनात अत्यंत महत्वाचे आहेत याबाबत काही दुमत नाही. ह्या परीक्षा जीवनाला वळण देतात त्यामुळे या कडे पालक आणि विद्यार्थी गांभीर्याने लक्ष देतात नव्हे दिलेच पाहिजे. परंतु त्याची तयारी फक्त दहावी किंवा बारावीच्या वर्षात करून चालणार नाही हे ही लक्षात घ्यावे. प्राथमिक वर्गापासून मुलांच्या अभ्यासाकडे पालकानी लक्ष द्यायला हवे. मुलांना दडपण वाटेल अशी आपली वागणूक मुलांच्या आयुष्यासाठी घातक ठरु शकते. मुलांची आवड निवड लक्षात घेऊन त्यांच्या सोबत मैत्रीपूर्वक वागल्यास मुले आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत. विद्यार्थ्यांनी सुद्धा पालकांच्या आणि परिवारातील सर्व सदस्यचा विचार करून आपले वर्तनुक ठेवावी. एका परीक्षेत अपयश मिळाले म्हणून नाराज न होता कश्यामुळे अपयश मिळाले याचा मागोवा घेऊन त्रुटी पूर्ण करावे आणि पुन्हा नव्या जोमाने परिक्षेला तोंड द्यावे. त्यावेळी जे यश मिळेल त्याची जीवन भर संपणार नाही. आपल्या हातून एक सुंदर विश्व निर्माण होणार आहे आणि त्याचे श्रेय अर्थातच आपणास मिळणार आहे. तेंव्हा चला कवी केशवसुत यांचे कवितेतील ओळी सदा स्मरणात ठेवू या " जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका"

जीवनातील यशस्वी पुरुष

दोन बायका एका छताखाली जीवन जगुच शकत नाहीत हे निर्विवाद सत्य आहे. मग त्या दोन बायका सासू-सुन असेल जावा-ननंद असो वा दोन जावा. ज्यांच्या घरात ही जोडी आनंदाने एकत्र राहतात असे दिसेल त्यांना उत्कृष्ट परिवार म्हणून घोषित करण्यास काही एक हरकत नाही. यांचे एकमेकांना कधीच
पटत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन यांचे वाद आणि भांडण होत राहतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंब व परिवार काळजी व चिंता ग्रस्त होऊन जातो. घरातील सदस्य म्हटल्यावर सर्वावर सारखेच प्रेम असते आणि हक्क सुद्धा सारखेच. एकीला बोलावे तर दुसरीला राग घरातील पुरुषाची अवस्था अडकित्यात सापडलेल्या सुपारी सारखी होते. काय करावे हेच सूचत नाही. इकडे आड आहे अन इकडे विहीर.
अश्या विपरित परिस्थिती मध्ये पुरुषाची खरी सत्वपरीक्षा ठरते. पुरुष शेवटी आपल्या आई-बहीन यांचेच ऐकतो बायकोचे काहीच ऐकत नाही असा आरोप सासरची मंडळी तिच्याकडून बोलताना करतात. पत्नी समजून घेईल या आशेवर पुरुष घरातील मंडळी कडून बोलते झाला की त्याची अवस्था धोबी का कुत्ता घर ना घाट का अशी होऊन जाते. एखाद्या घरात पुरुष आपल्या बायकोचे ऐकून वागतो तेंव्हा त्याला आपल्या जवळचीच मंडळी खुप नावे ठेवतात. हा बायकोचा ऐकणारा बाईलगा झालाय. बायकोपुढे याला काहीच दिसत नाही. लहानाचा मोठा केला तर साधी विचारपुस नाही की चौकशी नाही. असे वेगवेगळे आरोप आत्ता घरातील लोकच लावतात तेंव्हा पुरुषानी वागावे तरी कसे असा प्रश्न सतावितो. याच वैमनस्य मधून कुटुंबातील कलहाने एकाचा मृत्यू अश्या आशयाची बातमी वाचली की कुटुंबातील हे चित्र डोळ्यासमोर येते. वास्तविक पाहता बायकोला पुरुषानी विश्वासात घेऊन एकांतात जर समज दिली तर हे वाद मिटू शकतात. मी करतो मारल्यासारख आणि तू कर रडल्या सारख ही *सर्जिकल पध्दत* वापरली तर आपले जीवन यशस्वी होऊ शकेल.वाद विवाद भांडण तंटा प्रत्येकाच्या घरी आहे. असे एकही घर सापडणार नाही जेथे भांडण नाही. त्यामुळे घरातील समस्याचा निपटारा पुरुषानी योग्य प्रकारे हाताळणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्या सुंदर जीवनाचे तीन तेरा वाजले म्हणून समजा.

- नागोराव सा. येवतीकर, 
   मु. येवती ता. धर्माबाद 
   09423625769


*वाचन प्रेरणा दिवस*

वाचाल तर वाचाल अशी एक म्हण आपल्याकडे प्रसिध्द आहे. वाचन हा प्रत्येक मानवाच्या मेंदुचा खुराक आहे. वाचन केल्यामुळे आपणास बरीच माहिती मिळते. ज्ञानाचा साठा वाढतो. त्याच सोबत आपण प्रगल्भ देखील बनत असतो. आजकाल वाचन करणे फार कमी होत चालले आहे अशी समाजात ओरड सुरु आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. याउलट सोशल मीडिया नावाच्या whatsapp आणि फेसबुक मुळे लोकांची वाचन संस्कृती वाढली असे म्हणण्यास काही हरकत नसावी. दिवसातुन अनेक ग्रुपच्या माध्यमातुन बरीच अनोळखी माहिती बघायला आणि वाचायला मिळत आहे. हे काय कमी आहे. त्यातल्या त्यात ebook लाईब्रेरी मुळे तर पुस्तकांच्या पुस्तके pdf मध्ये वाचता येत आहेत. आज जे पुस्तक म्हटले त्या पुस्तकाची माहिती नेट वर उपलब्ध होत आहे आणि त्यातून वाचन संस्कृती मध्ये वाढ होत आहे. असे जरी दिसत असेल किंवा भास होत असेल तरी वास्तव थोडे वेगळे आहे. हे ही नाकारुन चालत नाही.
वाचनाच्या प्रक्रियेला शाळेतुन सुरु होते. तसे मुले लहान असताना चित्र वाचन अगदी छान रित्या करतात. तेथून त्यांच्या वाचन कौशल्य विकसित होण्यास सुरु होते. मग त्यानंतर अक्षर आणि अंकाची ओळख होते. हळूहळू वाचन कला जमायला लागते. भाषा कौशल्यामध्ये श्रवण व भाषण हे फार महत्वाचे आहे. कारण त्यावरच वाचन ही क्रिया पूर्णपणे अवलंबून आहे. ज्यांच्या वरील दोन क्रिया योग्य प्रकारे होते त्या मुलांचा विकास योग्य दिशेने होतो. तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना श्रवण व भाषण ही क्रिया जमवण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी केला जातो. तेथे प्रगती नक्की दिसते. खाजगी शाळेत यावर आवर्जून लक्ष दिले जाते. तर इकडे सरकारी बालवाडी मध्ये खाऊ वाटप करण्या पलीकडे काहीच होऊ शकत नाही. यात मला त्यांना दोष द्यायचा नाही पण पाया मजबूत करण्याकडे कुणाचेच अजिबात लक्ष नसते आणि मुले वरच्या वर्गात गेली की त्याला लिहिता वाचता येत नाही म्हणून त्या दोषाचे खापर शिक्षकांच्या अंगी फोडून मोकळे होणे एवढे मात्र सर्वाना जमते. एखादा रस्ता ख़राब होताना वेळीच लक्ष दिले आणि तातपुरती दुरुस्ती केली तर रस्ता दीर्घकाळ टिकू शकतो. त्याकडे लक्षच दिले नाही तर रस्ता पुन्हा नव्याने करावा लागतो. विद्यार्थ्यांचे जवळपास तसेच आहे. प्राथमिक वर्गात असताना त्यांच्या चूका व त्रुटी लक्षात घेऊन त्यात दुरुस्ती केल्यास ती मुले शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जाणार नाहीत. अमुक विद्यार्थ्याला लिहिता वाचता येत नाही हे वरच्या वर्गात गेल्यावर लक्षात आल्यास काहीच करता येत नाही. रस्ता पुन्हा नव्याने करता येऊ शकेल पण विद्यार्थ्यांना पुन्हा पाहिली किंवा दूसरी चा अभ्यास शिकवून तयार करणे फार कठीन आणि जिकरीचे आहे. त्यासाठी वेळीच पालक शिक्षक यांनी जागरूक होऊन त्यांच्या प्रगती कडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलांच्या एकूणच शैक्षणिक प्रगती मध्ये वाचनाचा सिंहाचा वाटा आहे. जी मुले योग्य गतीत वाचन करतात त्यांची प्रगती नियमानुसार होत राहते. वाचन केल्याचा खरा आनंद जर आपणास पहायचा असेल तर ते पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील मुलांच्या चेहऱ्यावर पाहता येईल. वर्गातील एक दोन मुले खुप छान वाचन करतात तेंव्हा ज्याना वाचन करता येत नाही त्यांना त्या मुलाचा हेवा वाटते. वर्गातील सर्वच्या सर्व मुले वाचू लागली की त्याचा खरा आनंद त्या शिक्षकाना होतो. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अगदी ठळक दिसून येते. असा आनंद मिळविण्यासाठी मात्र शिक्षक मंडळींना खुप प्रयत्न करावे लागते हे ही सत्य आहे. वाचन प्रेरणा दिवस साजरा करून कोणाची वाचन कौशल्य मध्ये प्रगती होणार नाही त्यासाठी दररोज अर्धा तास तरी मुले वाचन करतील असे नियोजन शिक्षकांनी करणे आवश्यक आहे. दिनविशेष पुरते त्याला बंधनात न ठेवता ती प्रक्रिया रोज राबविण्यासाठी मुलांकडून पाठाच्या उताऱ्यातील पाच वाक्याचे रोज वाचन करून घ्यावे. वाचन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपण कितीही वाचन केलो तरी नित्य नविन माहिती मिळविण्यासाठी वाचन हे करावेच लागते. रोज पाच वाक्य वाचन करण्याचा सराव कधी पाठ वाचन करण्यात होते हे कळतच नाही. मुले सुद्धा अगदी योग्य गतीत वाचन करतात. वर्गातील धीम्या गतीने वाचन करणारा मुलगा देखील येथे गती घेतो. हा प्रयोग मात्र सतत चालू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सतत वाचन करण्यात व्यस्त असत त्या वाचनातुन ते विद्वान झाले. असेच अजून एक महान व्यक्ती म्हणजे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, यांनी सुद्धा आपल्या जीवनात वाचनाला खुप महत्त्व दिले आहे. ते दिवसाचे सोळा-सतरा तास वाचनात घालवित असे. म्हणूनच त्यांचा जन्म दिवस 15 ऑक्टोबर  संपूर्ण महाराष्ट्रात *वाचन प्रेरणा दिवस* म्हणून गेल्या वर्षीपासून साजरी केली जात आहे. फक्त आजच्या दिवशी एक तासभर वाचन करण्यापेक्षा रोज किमान पाच वाक्याचे वाचन प्राथमिक वर्गात केल्यास त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे वाटते.

- नागोराव सा. येवतीकर 
  मु. येवती ता. धर्माबाद
  09423625769

★★★★★★◆◆◆◆◆◆★★★★★★★★




No comments:

Post a Comment