Thursday, 29 September 2016

संतोष शेळके

नाव : संतोष एकनाथ शेळके

जन्म तारीख : ०१/ ०६/ १९८२

पत्ता : मु. पो. कळंब, ता. कर्जत, जि. रायगड , पिन - 410101

मो. नं. 823739804

 Email Id : shelke.santosh8@gmail.com

शिक्षण :- इलेक्ट्रीकल डिप्लोमा 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणमध्ये सेवेत

रायगड जिल्हा सचिव - महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन

कोकण विभाग संपर्क प्रमुख : राजा शिवछत्रपती परिवार, महाराष्ट्र राज्य

साहित्यातुन ओळख -समाज  प्रबोधनपर लिहाण्याचा प्रयत्न असतो.
"दिवाळी अंक "यामधून काही कविता प्रसिद्ध..
सामाजिक कार्य करताना, राजा शिवछत्रपती परिवार अंतर्गत दुर्गसंवर्धन मोहिमा करत असताना, लेख, कथा, कविता यांमार्फत समाजजागृती साठी प्रयत्न..
========================================

 * सदर लेख काल्पनिक आहे... वास्तवाशी काहीही संबंध नाही, फक्त समजुन समाजपरिवर्तन घडवणं महत्वाच.. 🙏

* " हुंडाबळी " शापित मानसिकता * ------------------------------------------------

   जेष्ठातला मृग नक्षत्र सरता - सरता.. ' वरूण राजाला ' च किव यावी आणि आमच्यावर कृपा व्हावी. म्हणुन " लेट पण शेठ " सारखा सरींच्यारुपाने आज बरसला होता.. ⛈⛈ ' चातका ' बरोबरच ' वसुंधराही ' मनाला दिलासा मिळाल्यासारखी मातीला मृदसुगंध देऊन शहारली होती... पक्षीही वर्षाराणीच्या चिंबस्पर्शाने हर्षित होऊन आसरा घेत मनमोकळे पंख हलवुन जणु " स्वागतम् " च्या गुढभाषेत वरूणराजाचे आभार मानत असावेत...

धुळ आणि प्रदुषणाने मलिन, मरगळ झालेली वृक्षवेली नुकतीच आंघोळ करून " बाळसा " घेतल्यासारखी टवटवली होती.. हवेतला शितल गारवा तना - मनाला मोहुन टाकत होता आणि अशाच पावसाच्या चाहुल मनानं.. पुर्वनियोजनाच्या विचारमंथनात चौथ-यावर बसुन निसर्गाची किमया कुतुहलाने " नेत्रचक्षुत " साठवत होतो .. इतक्यात मोबाईल हाका मारू लागला.., " मर्द मावळा , गडी रांगडा .. शिवबाची भक्ती " ( मोबाईलमध्ये ठेवलेली रिंगटोण ) पण मुळात मी ज्या विश्वात हरवलो होतो, त्याव्यतिरिक्त मला काही सुचत नव्हतं..!  आता आमच्या सरकार ( बायको ) मला आवाज देत होत्या.., " अहो, फोन वाजतोय केव्हाचा .." मोबाईल हातात देत, एव्हाना त्या स्वयंपाक घरातील कामगिरीवर निघुनही गेल्या होत्या... कॉल रिसिव्ह करून.. मोबाईल कानाला लावला , ताडकण !! जागेवर उभा राहीलो आणि हाता-पायांना कंप सुटला होता माझ्या.. कारण समोरून हुंदक्यांचा आवाज येत होता. मलाच काही सुचत नव्हते की, नक्की काय घडलंय..??
      हॅ....लो ( काप-या स्वरात ) मी पुन्हा जाणण्याचा प्रयत्न केला तर, समोर माझा मित्र दिनेशचे रडवे " स्वर " कानावर आले आणि त्याने सांगितलेली हकिकत ऐकुन माझ्याही ह्रदयाची स्पंदने धडधडुन.., नकळत डोळ्यांतील अश्रुंनी केव्हाच ओठांच्या सिमा गाठल्या होत्या. मित्राला सांत्वनाचा आधार देत होतो पण स्वत:ला अद्याप सावरलं नव्हतं.. हाता-पायाचा कंप अजुन तसाच होता आणि त्याच अवस्थेत मी आता दिनेशकडे जायला निघालो होतो.

    देशातील विकृत मानसिकतेने आज एकाचा बळी घेतला होता.. " हुंडाबळी " या समाजाला ग्रासलेल्या महारोगाने एक निष्पाप जीव घेतला होता. माझा मित्र दिनेश... दिनेशची बहिण " अश्विनी " ह्या दृष्टांच्या लोभ, हव्यासापोटी जीवाला मुकली होती. हैवानांच्या कर्माने आज आई-बाप आपल्या लाडक्या " लेकीला " व एक पाठीराखा भाऊ " बहिणीच्या मायेला " पोरका झाला होता.., आज एक माहेरवाशीन रस्त्यात हरवली  होती.., एक घायाळ पक्षीण आपल्या " चिमण्या - पाखरांना " सोडुन गेली होती.. किती भयानक घडलं होतं आज..??

दिनेश आणि मी त्याच्या आई-वडिलांना घेऊन घटनास्थळी पोहचलो होतो.. आता तेथिल दृश्य पाहुन मनात रागाचा प्रचंड भडका ( अगदी, भर उन्हात हवेने " वणवा " भडकतो तसा ) उडाला होता... आपल्या चण अपेक्षेंच्या खातर या नराधमांनी जे कृत्य केलं होतं.., त्याला ' कडेलोट ' शिवाय शिक्षाच नसावी.. दिवसें- दिवस ह्या लालसावलेल्या निर्लज्य वृत्तीने कळस गाठला होता.. आज यांच्या अपराधांचा ' घडा ' भरला होता.. " हुंडाबळी " या शापित मानसिकतेचा प्रत्यक्ष थरार अनुभव मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो.., अनुभवत होतो..

आक्रोश , किंकाळी आणि आईची ह्रदयातुन टाहो फोडणारी आर्त हाक.., एका बापाला त्याचं सर्वस्व हरवताना.., तसेच एका भावाची अखेरची माहेरची साडी देताना झालेली अवस्था पाहुन.. आज माझ्यातला " पाषाण " माणुसही रडत होता..

काय वाटलं नसेल का ?? तिच्यावर रॉकेल ओतताना.., तिच्या देहाला आग लावताना.., पाझरला नसेल का ?? त्यांचा मन तिची आर्तता ऐकुन.., दिसला नसेल का ?? तो देह जळताना- हळहळताना.., त्यांनी पाहीली नसेल का ?? स्वत:च्या मुलीला व बहिणीला तिच्या रुपात.. काय लोकं असतील ?? काय मानसिकता असेल ह्यांची ?? अशा विचारातुन , मनाचा " तिळ पापड " होत होता नुसता..

कोळसा होऊन गेला होता तो देह.., शांत झाला होता.. संपला होता एका अबलाचा संघर्ष.., वाचविण्याची तिची धडपड... आज बापाची इज्जत पायदळी जाण्यापासुन स्वत:च जीवन अर्पण केलं होत एका लेकीनं..!!

त्याच क्षणी वाटलं...! आज राजं असते तर , " रांझ्याच्या पाटलासारखा चौरंगा " केला असता हराम खोरांचा.., माँसाहेब असत्या तर , हुकुम दिला असता कडेलोटीचा.. की, पुन्हा मढ्यावरचं लोणी खाणारी " बांडगुळ " शिल्लक ठेवली नसती.., अमरवेली सारखी दुस-याचा आधारावर वाढणारी फांद्या छाटल्या असत्या... पण आम्ही पण त्यांचेच पाईक ना..? त्यांच्याच प्रेरणेने पुढं आलेलो त्यांचे मावळेच ना..?? त्यांचीच शिकवण आहे आपल्याला तर आपण पुढाकार घेऊन हे कार्य तडिस न्यायचं आहे.

शपथ..! आहे शिवरायांची.. माँसाहेबांची.. आज ही शापित मानसिकता आपण नष्ट केलीच पाहीजे.आज आपल्या बहिणींना आपण ह्या नरकातुन मुक्त केलेच पाहीजे.आज अशा घाणरड्या रुढी - परंपरेच्या बेड्या तोडल्याच पाहीजे.. तरच, आपण शिवरायांचे शिलेदार समजु.. मावळे समजु..

चला शपथ घेऊ या.. पुन्हा नव्याने " शिवराज्य " आणु या.. 🙏🚩

✒ श्री. संतोष शेळके / कर्जत, रायगड
राजा शिवछत्रपती परिवार, महाराष्ट्र

🚩🙏 जय शिवराय 🙏🚩

           कलियुग_
*********************

अशा कलियुगी, मातला आतंक |
करिती पातक , रोजदिनी ||१||

रोजच मरतो, गरिब दुबला |
पिडित अबला , सर्व सोसे ||२||

लागुन व्यसन , नशेत बुडाली |
वाहत चालली , तरूणाई ||३||

पळत सुटला , मेळीत ऐश्वर्य |
नाही राही स्थैर्य, स्वार्थापायी ||४||

पाहीत गोपुरे , स्वप्न निरंतर |
पडता विसर , मानवाचा ||५||

होतो मनी दाह , ऐकुनी संगर |
दिसते भेसुर , सर्वकाही ||६||

नाही कोणी वाली, उरलासे तुजला |
अगतिक झाला , वाचविण्या ||७||

नष्टावा वैगुण्य , मनाचा संदेह |
झिजवावा देह , जनहिता ||८||

✒ शब्दांकन :- श्री. संतोष ए. शेळके / कर्जत, रायगड
" राजा शिवछत्रपती " परिवार ,
📞 ८२३७३२९८०४


 " व्यथा सह्याद्रीची "

सकाळी प्रात:विधी आटपून, दातांना शुभ्रतेची झाग देत अंगणात सह्याद्री पर्वत रांगेच्या दिशेने तोंड करून बसलो होतो.
वातावरणात दात आणि टुथब्रशचा आवाज नाद धरत असताना, आतापर्यंत स्तब्ध असलेला सह्याद्री पर्वत माझ्याशी काहीतरी बोलत असल्याचा व काहीतरी सांगत असल्याचा भास मला झाला आणि आणखिनच कान टवकारून मी ऐकण्याच्या अविर्भावात पवित्रा घेतला व ऐकू लागलो.
" हो बाळा... मी तुझ्याशीच बोलतोय, सह्याद्री.. होय, तोच मी, ज्याने महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोलाच्या ज्या जिवंत केला तो सह्याद्री."
थोडा अवाक् होऊनच वंदन करून ऐकत राहीलो... पुरता बुडून गेलो.. हेलावून गेलो.. त्याची व्यथा ऐकून.
तो पुढे सांगू लागला, " विज्ञान युगात विकासाचा टेंभा मिरवणा-या लोकांनी विकासाच्या नावाखाली माझं अस्तित्व नष्ट करण्याचा ठेकाच घेतला आहे. विकास आणि नागरीकरणाच्या नावाने तुम्ही मला जखमा देत सुटले आहात.
पूर्वी जनावरांचे हंबरडे, किलबिलणारी पाखरे, गंध सुगंधाने व रसाळ फळा - फुलांनी डोलणारी झाडे, रांगणारे झरेआणि मंजूळ सुरांनी मंत्रमुग्ध करणारा वारा, त्यावेळी माझ्या सानिध्यात मोठ्या हौसेने राहत, बागडत व त्या वातावरणात तुम्हीही आरोग्यदायी जीवन जगत..
पण आज तुम्हींही माझ्याबरोबर या संवगड्यांना पोरके झालात. अमर्याद वृक्षतोड, काँक्रीटीकरणाने , रहदारीसाठी वाढणारे रस्ते व प्रदूषणाने तुम्ही त्याचा -हास केलात बाळांनो. आज जंगले भकास झाल्याने जनावरे दुसरा आसरा शोधन्या निघून गेली. वृक्षातोडीने वातावरणाच समतोल बिघडून पाऊस- पाणी कमी झाला, त्यामुळे तुम्ही मनुष्य पाणी व सावली साठी वनवन भटकू लागलेत. तुम्हां लेकरांना कसे समजावू.. तुम्ही सुशिक्षित झालात ना.
ऋषिमुनींच्या मंत्रांचा तो जयघोष, संतांची अविट अभंगवाणी, माझ्या निसर्गाच्या सानिध्यात तयार होणारे साहीत्य, पोवाडे ह्या सगळ्यांचा हेवा वाटायचा त्यावेळी.
आज येथे सांधूंनी तर ढोंगीपणाचा कळसच केलाय, ' ऐसे कैसै झाले ढोंगी, कर्म करूनी म्हणती साधू ' असे म्हणायची वेळ आणली ह्या पाखंडींनी, संतांच्या अभंगाऐवजी दारूच्या नशेत अस्लिल फिल्मी , डिजेच्या ठेक्यावर नाचणारी निर्लज्य कार्टी पाहून ह्यांना माझ्या एखाद्या कड्यावरून ढकलून द्यावे असे वाटते. आणि साहीत्य तर बेसूर, पानचट झाले, हे का झाले कधी जाणण्याचा प्रयत्न केला तुम्ही ??
" सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव-शंभू राजा, दरी-दरीतून नाद गुंजला..." ऐकताना छाती अभिमानानं फुलायची. माझ्या शिव- शंभूच्या पराक्रमाने, त्यांच्या कतृत्वाने माझा रोमरोम पुलकित व्हायचा. अशा निष्ठावान व पुण्यवान राजा व त्याच्या संवंगड्यांनाही दरीखो-यात लढताना मदत करताना मला गौरव वाटायचा.
मला जपलं व संवर्धनल त्या माझ्या शिवबानं.. स्वराज्य उभं केलं माझ्या कुशीत.गडकोटांची निर्मिती केली व माझ्यात सामावलेल्या बापाला तेवढ्याच जबाबदारीची जाणिव करून दिली की, मी बाप असल्याची. आयुष्याची ५० वर्षे झटला, बिचारा माझ्या गडांचे संक्षण करता- करता तुम्हांला जपताना...
त्या लाडक्या लेकरानं, माझ्यारूपानं तुम्हां रयतेला अभेद्य संरक्षण उभं केल पण तुमच्यासारख्या मतलबी व आळशी लोकांनी दुर्लक्ष केलं आणि माझ्या आयुष्याला उतरती कला लागली. आज पहायला या.. काय अवस्था आहे माझ्या गडांची व जंगलाची..
बाळांनो या रे.... आजही वेळ गेलेली नाही. आज माझ्यासारख्या म्हाता-याला तुमच्यासारख्या तरूणांचा आधार वाटतो. आज जे गडकिल्ले ढासळताना दिसतात, त्यांना संवर्धना.. त्यांचे रक्षण करा रे.. वृक्षांची लागवड करून पुन्हा माझ्यासारख्या वृद्धाला निसर्गाचा साज चढवा रे..
मग बघा, पुन्हा नव्यानं तरूण होऊन कशी साथ देतो ती.. या अवघे या, मिळून या... त्या मुक्या जनावरांचे जीवनदाते व्हा.. माझ्या बापाची तुम्हां लेकरांकडून हीच अपेक्षा आहे रे..
तेवढ्यात आईने आंघोळीसाठी पाणी काढल्याची बोंब दिली आणि आतापर्यंत सह्याद्रीच्या आत्मकथेत हरवलेला मी भानावर आलो. आज पहील्यांदाच तो माझं ह्रदय घायाल करून गेला होता. व मी स्वत: ला माफच करू शकणार नव्हतो.
तर.. चला मित्रांनो, त्या मुक्या साक्षिदाराचे बोलविते होऊ.. त्याचे संवर्धन करू..🙏�🙏�
जय जिजाऊ... जय शिवराय..

✒ श्री. संतोष ए. शेळके / कर्जत, रायगड
राजा शिवछत्रपती परिवार, महाराष्ट्र.


*चारोळ्या*

१) स्वप्नसुखाच्या लाटेवरती
    ध्येयवाळुचे बांधले इमले..|
     प्रयत्नवादाने ते बनताना
    अपयशाचे सागरही नमले..||

२)
राजकिय रंगमंचावर
आश्वासनांचा मुखवटा होता..|
गरीब आशेचा घात येथे
पैसे कमालू नाटक होता..||

३)
पानावरी दवबिंदू जसे
अश्रू पापणीत साठवले..|
आठवणींचे क्षण तुझे
ह्रदयी हळुवार जपले..||

४) बहरत गेले नकलत असे ते
नातं कधी शब्दांशी जुळलेच नव्हते..
आजपर्यंत त्यांच्याशी अजाण होतो
खेळ तयांचे मज कळलेच नव्हते..

५)
बेधुंद अशा चांद रातीत
विरह तुझा गं मज छळतो..|
बाबरा मन होई बेचैन
जेव्हा चंद्रात मी तुज पहातो..||

६)
श्रावणातल्या कोवळ्या उन्हात
साेबती भुरभुरता पाऊस..|
ह्रदय क्षितीजावरी उमटले
आठवणींचे सप्तरंगी दिवसा..||

७)
नदिकिनारी स्तब्ध कातरवेळी
विरह तुझा गं मज छळतो..|
गहिवरल्या मनी आठवणी
तव् प्रितीचा हुंदका दाटतो..||

८)
साज तुझा गं साजने
बघ जीवास वेड लावी..|
अप्सराच जणू इंद्राची
धरतीवर तुच असावी..||

९)
येणा-या तुझ्या त्या रस्त्याने
मी प्राजक्ताचे सडे शिंपीले..|
वाट पाहतो होऊनी बावरा
भेटी तुझ्या जीव आतुरलेले..||

१०)
नयनी तुझ्या गं आज
अश्रू का ते दाटले..?
गुन्हा तुझाच त्यावेळी
प्रेमात मज परके केले..||

११)
शृंगारलेल्या हिरव्या वनी
निशाणा सावज मी धरलेला..|
मोहुनी गेलो त्या मृगनयना
ह्रदय फितुर गं सावजाला..||
====================================
*तुझ्या आठवणींत...*

तुला विसरण्यासाठी,
रुसुन बहाणा केला खरा,
तुझ्यापासून स्वत:ला, 
दुर नेण्यासाठी...

पण हरवून बसलो मी,
स्वत:ला तुझ्या आठवणींत....

भुक नाही,तहान नाही,
झोप तर उडुनच गेली,
खुप प्रयत्न केले, 
स्वत: सावरण्यासाठी...

तेव्हा मन जास्तच बेचैन होई,
झुरताना 
तुझ्या आठवणींत....

राना-वनांत फिरलो,
फुलां-वेलींत रमलो,
पक्षी-पाखरांसवे बागडलो, 
मन रमवण्यासाठी...

पण आणखीन मोहोरलो, 
झाडाखाली 
तुझ्या आठवणींत....

बरसणा-या पावसात,
वाहणा-या झ-यांत,
मनाला चिंब भिजवले, 
तुझी आठवण 
धुण्यासाठी...

तेव्हाही शहारले अंग माझे,
चिंब भिजलेल्या, 
तुझ्या आठवणींत... 

आता पुर्ण हरलो होतो,
हतबळ होतो तुझ्या प्रेमात,
मन धाव घेते आता, 
तुझ्या 
माफीसाठी...

चुक उमजली माझी मला,
ह्रदयात राहिलेल्या, 
तुझ्या आठवणींत....

माफ करशील ना मला ??
माझ्या नादान गुन्ह्याला,
शपथ..! आहे तुला
साथ नकोच आता 
कधीच सोडण्यासाठी...

बावरं मन माझा , 
हरवून जाईल पुन्हा, 
तुझ्या आठवणींत....

✍🏻 संतोष ए. शेळके / कर्जत

====================================

*आम्ही लहान असताना..*

लहानपणी
लपंडाव खेळताना
तलावात पोहताना..

शिवला नाही 
मनाला कधीच 
जाती भेद, 
आम्ही 
लहान असताना...

शाळेत डब्बा 
चोरून खाताना
दाताने तोडलेली 
गोळी खाताना..

कधी नाही 
असे वाटले.
उष्ट खाल्ल्याने बाटू
आम्ही 
लहान असताना...

गणेश उत्सवात 
नाचताना
ईदला एकमेकां 
भेटताना..

सण कधीच नव्हता
वेगळा आम्हांला,
आम्ही 
लहान असताना...

मोठे झाल्यावर
वावरताना,
पाहिली 
माणसे दुरावताना...

पण केव्हाच 
दुरावलो नाही,
जाती-धर्माच्या भांडणात,
आम्ही 
लहान असताना...

पाहिले मोर्चे, 
दंगली घडताना
माणूस धर्म 
जातीत भांडताना...

खरच बरं ! 
अडाणीच होतो
अशा गोष्टींपासुन,
आम्ही 
लहान असताना...

ठरवलंच, 
आता हरायचे नाही
माणूस 
"माणसात "जोडताना...

घेऊन 
धडा माणुसकीचा
शाळेत शिकवलेला, 
आम्ही 
लहान असताना...

✍🏻 संतोष ए. शेळके / कळंब,
कर्जत, रायगड..

====================================

पेटवा मशाल नवक्रांतीची__
***********************

स्मरूनी गाथा महापुरूषांच्या,
मिळुनी घेऊ शपथ जनहिताची |
घडवु समाज..करूनी प्रबोधन
पेटवा मशाल, शिव'क्रांतीची..! |धृ|

मरतो निरापराध माणुस,
जिथे रोजच आतंकवादाने

जाती-धर्मात लागुनी वणवा,
तेथे घेता आग प्रांतवादाने
या उठा हो सर्व बंधूंनो

विसरून भांडणे जातीयवादाची
धरूनी मनी भेदा-भेद अमंगळ
लावु पताका समतेची...!
घडवु समाज, करूनी प्रबोधन.... |१|

आपल्या आधुनिक भारतामध्ये,
नित्य  वाढु लागला भष्ट्राचार

निद्रावली लोकशाही इथे,
वाढत आहे रोजच अत्याचार

उठा सुशिक्षितांनो, टाका ठेचुनी,
नांगी ढोंगी राजकारणाची

घ्या शस्त्र हाती हो शिक्षणाचे
नष्ट करण्या मुळे भ्रष्टाचाराची...! 
घडवु समाज, करुनी प्रबोधन... |२|

सुटले तोडित पिसाट कोल्हे,
लचके तव अबला नारिचे

रोजच मरते हुंडाबळीने,
करिते प्रताप भ्रृणहत्येचे

उठा-उठा हो, बाळ लेकरांनो,
लाज राखण्या आई-बहिणींची

जन्मा घातले जिने तुला
आली वेळ त्याच दुधाला जागायची...!
घडवु समाज, करूनी प्रबोधन... |३|

✒ श्री. संतोष ए. शेळके , कर्जत
राजा शिवछत्रपती परिवार, महाराष्ट्र

====================================

कातरवेळ___
**************

अशाच एका कातरवेळी,
मनास छळती तुझ्या आठवणी.
स्तब्ध होत्या मुक्या-मुक्या भावना,
मनात उठले काहुर परतुनी..

जीवन सुखाच्या वाटेवरती,
थकलो होतो वाट पाहुनी.
एकच होती मनात आशा,
फक्त साथ तुझ्या सहवासातुनी..

स्वप्नांमध्ये नकळत डुंबलो,
विसरलो स्वत:ला भान हरवुनी.
ह्रदयातील त्या नाजुक क्षणांचे,
भाव आले नयनी दाटुनी..

का घडवा..? दोन मनांत दुरावा,
उलगडले ना हल प्रश्नांतुनी.
अधुरेच राहीले स्वप्न प्रेमाचे,
आठवुनी गहिवर आले मनातुनी..

ह्रदयातील त्या स्वप्नसुखांचे,
हवेहवेसे क्षण गेले भंगुनी.
अशी जिव्हारी मज लागुनी गेली,
भेट आपुली कातरवेळच्या स्वप्नांतुनी..

✒ श्री. संतोष शेळके/ कर्जत
मो. नं. 8237329804
====================================

*विचार बदला__*
----------------------------

जिर्ण इमारती सम पडके
अज्ञानाचे तव जुनाट वाडे
टाक बदलुन विचार आता
शिक्षणाने उघडली दारे || १ ||

मिळाले ना तुला काही त्यातुनी
फक्त मनस्तापाची आली पाली
टाक पेटवुनी भल्या माणसा
वाढलेल्या, अंधश्रद्धेची होळी ||२||

का रे..! कुस्करली गर्भात तिला
वंश चालविण्या आपला पुढे
दे विचार टाकुनी पायदळी
जिच्याने चाले उत्पत्तीचे गाडे ||३||

एकटी ती अबला नारी पाहुनी
आणली मनी का ? तु घाण मती
तुझीच बहीण अन माता समजुनी
कर तु रक्षण,जाणुनी सत्य निती ||४||

येतील घेऊनी तारे नभीचे
दिस सुखाचे तुज स्वर्गातुनी
बदल तुच विचार मनीचे
फिटेल अंधार शिक्षणातुनी ||५||

शब्दांकन: श्री. संतोष शेळके / कर्जत

धन्यवाद... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
*साहित्य दरबार स्पर्धा - स्वच्छतेचे महत्त्व*

*स्वच्छतेने होते मनही स्वच्छ*
*स्वच्छतेने होते आरोग्य निरोगी..!*
*स्वच्छतेचे महत्त्व जाणू या*
*करू देशाचा विकास सर्वांगी..!*

" स्वच्छ भारत , सुंदर भारत " चा नारा आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो, पण कधी विचार केला आहे का..? खरंच सर्वत्र स्वच्छता आढळते का..? तर नाही, मग आपण तरी काही कार्ये केलेली आहेत का..? स्वच्छतेसाठी, तर नाही.. खरंच.! वाढत्या लोकसंख्येबरोबर देशाला भेडसावणारा प्रश्न असेल, तर तो "प्रदुषण म्हणजेच अस्वच्छतेचा.." ज्या वेगात लोकसंख्या वाढते, अगदी तेवढ्याच झपाट्यात प्रदुषण, घाण वाढून रोगराई पसरून आरोग्य धोक्यात येत आहे. मग यासाठी कारणीभूत कोण असेल, तर आपणच.. आज चिकनगुनीया, स्वाईन - फ्लू , डेंगू , मलेरिआ यांसारखे कित्येक महारोग घर करून बसले आहेत..आणि त्याचे परिणाम आरोग्यावर घातक ठरत आहेत. अशा अस्वच्छतेतून आपण स्वत:लाच मरणाच्या खाईत लोटत आहोत.. आज देशाला गरज आहे, ती स्वच्छतेचा मंत्र जपून, एक महान भारत घडवण्याची..

" गावचे जरी उत्तम नसले | तरी देशाचे भविष्य ढासळले | ऐसे मानावे जान त्यानं भले | ह्रदयामाजी || " 

या अभंगातून , ग्रामागीतेतून, विचारांतून संत तुकोबा महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांसारख्या संतांनी , " केल्याने होत आहे रे..! आधी केलेची पाहीजे..! " या सिद्धांतानुसार नुसते विचार मांडत बसले नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून दिले व मोठ्या प्रमाणात ग्राम स्वच्छता अभियानाने चालवून देशाची सेवा केली..

आज २१ व्या शतकात तर प्रदूषण , रोगराई यांसारखे महाभयंकर संकट देशाला मोठे आव्हान ठरत आहेत. वाढत्या नागरीकरणाने.. गलिच्छ राहणीमान, रहदारी, औद्योगिकरण , राहण्यासाठी अपुरी जागा या समस्येमुळे प्रदूषण वाढून अनेक रोग उद्भवत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात तर अजूनही स्वच्छतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचले नाहीत. त्यामुळे बरेचसे लोकं शौचालयास उघड्यावर बसणे; गाई - गुरे , कपडे पाण्यात धुणे ; केर - कचरा यांची योग्य विल्हेवाट न लावणे ; अस्वच्छ पाणी, अन्न गचाळ राहणीमान यांच्या वापराने मोठ्या प्रमाणात आजही आजार व रोगराई कमी होत नाही. तसेच शेतीत रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर, भेसळयुक्त अन्न यांमुळेही आरोग्याला धोका निर्माण होत आहे. 

स्वच्छताही देश का सौंदर्य.. |
जिसे लाना हैं , हमारा कर्तव्य ||

येत्या काही वर्षापासून महाराष्ट्र शासनाने "संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभिमान " राबवून व मोठ्या प्रमाणात पारितोषिक जाहिर करून आणि २०१५ पासून देशाचे पंतप्रधान मा. मोदीजी यांनी " म. गांधी स्वच्छ भारत अभियान " चालवून अस्वच्छता नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पावले उचललेली दिसत आहेत.. त्याचप्रमाणे आपणही शाळा - कॉलेजमधून, वॉट्स - अप, फेसबुकच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवून, नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून लोकजागृती करणे आज गरजेचे आहे. सिनेमे, नाटक, साहित़्याच्या माध्यमातूनही आपण आज स्वच्छतेची जागृती करू शकतो. 

चला तर उचला लेखणी अन् झाडू..
स्वच्छतेतून रोगराईला पुर्ण गाडू..||


___ ✍🏻 संतोष ए. शेळके @24
 मु. पो. कळंब , ता. कर्जत / रायगड
मो. नं. 8237329804
Email ID : shelke.santosh8@gmail.com


1 comment: