"शेतकरी जगला तर देश टिकेल "
उपाशीपोटी राहून कोणीही देशभक्त होऊ शकत नाही. पण भरलेली पोटं बेईमान झाली तर त्यासारखं दुर्दैवंही नाही. आता बेईमान म्हणन्याचा
अर्थ असा, की ज्यांच्या कष्टानं, मेहनतीनं आपल्या ताटात भाकरी आली त्या अन्नदात्याला विसरून आणि त्याची साधी जाणीवही आपणास राहिली नाही तर देशभक्ती आणि इतर गप्पा या निव्वळ पोकळ ठरल्या वाचून राहणार नाहीत. या भारत देशात कृषी हा एकमेव सर्वाधीक केला जाणारा व्यवसायआहे आणि म्हणूनच भारताला कृषी प्रधाण राष्ट्र म्हणून ओळखले जाते.. पण सरकार आणि निसर्ग यांच्या कचाट्यात सापडलेली शेती आणि शेतकरी मरणोत्सव साजरा करते आहे, अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्यांच्या आत्महत्याचे आम्हाला काहीच वाटत नाही.आमच्या संवेदना गोठून गेल्या आहेत. पण दाताच नसतो तिथे झोळी पसरली काय किंवा ओंजळ केली काय, ती रितीच राहणार आहे... म्हणून दात्याचे स्मरण असावे विस्मरण नसावे. शेतात पेरल्यालं पदरात पडे पर्यंत कशाचाच भरोसा नसतो.निसर्गाचं अवेळी बरसणं, कधी दुष्काळ तर कधी नको तेवढी रिपरिप तर कधी गारपीट अशा अनेक दिव्यातून शेतकरी वाट काढत पुढं जात असतो. पण त्याच्यासाठी ना कोणता वेतन आयोग ना कोणती जीवन फुलवणारी योजना. राबराब राबणारे हात, उन्हं झेलत कष्टणारे, पावसात बेणनी करणारे कष्टकरी,रक्ताला गोठवून आणि आठवून शेती पिकवणारा शेतकरी खऱ्या अर्थानं आजही दुर्लक्षित आहे. एसी. मध्ये राहून शेती तंत्र विकसीत करणारे असो वा ताटात आलेली भाकरी किती आणि कोणाच्या कष्टानं ओतपोत झालेली आहे. आणि त्यामागे कोणाची किती मेहनत आहे याची किंचितही जाण नसणारे हे देशभक्तीचे आणि सबुरीचे सल्ले देत असतात. पण कधी भेगाळलेल्या पायाला चिखलाचा मलम लावून, तर आग ओकणाऱ्या सूर्याला डोक्यावरील
मुंडास्याने रोखणाऱ्या कृषकाला शहरी झगमगाटात वावरणाऱ्या, डांबरी रस्त्यावरून धावणाऱ्या आणि पायाला घाण लागते म्हणून जेवतानाही चप्पल न काढणाऱ्या लोकांना वेदना आणि दुःख काय असते याची पुसटशी तरी जाणीव असेल काय...? महात्मा गांधीनी 'खेडयाकडे चला' नारा दिला, पण आज शहरीकरण आणि शहराचे आकर्षण वाढत आहे. तसेच वाढत्या औद्योगिकरणामुळे शेती क्षेत्र कमी होत आहे. सुखशाली जगण्याची जीवनशैली सर्वांना खुणावत आहे. त्यात निसर्गाची लहर आणि शासनाचा कहर याने कृषक पुरता खचून गेला आहे.तेव्हा खचलेली मनं आणि पिचलेली मनगटं उभारी येण्यास वेळ लागतो आहे. शेतकऱ्यांना फुकट कांही देण्यापेक्षा नियमित आणि सुरुळीत दयावे. शेतातील वारंवार जाणारी वीज उभ्या पिकाचा जीव घेते. योग्य दाबानं नियमित वीजपुरवठा शेतकऱ्याच्या पिकाला वाढवल्याशिवाय राहणार नाही.पिक पाणी जोमात असताना शेतकरी फुकट कांही मागणार नाही.पिकवलेल्या मालाला हमीभाव मिळाला तर शेतकरी केलेले कष्ट विसरून नव्या जोमानं आणि उमेदीनं आपणास अन्न पुरवठा करेल यात शंका नाही.पण जे चित्र काल होते ,परवा होते तसेच कमी आधिक प्रमाणात आजही आहे. संत तुकारामांनी शेतकऱ्यांचे मांडलेले दुःख असो वा अलिकडे महात्मा ज्योतिराव फुले .यांनी मांडलेले दुःख असो , या दुःखात फारसा फरक झालेला दिसत नाही.. अक्षरशुन्य राहिलेल्या पिढीला त्या त्या काळातील स्वतःला ज्ञानी म्हणवून घेणाऱ्यानी
पिळून काढलं आर्थिक व शारीरिक बाबीत. पण शेतकरी हालापेष्टा झेलत उभा होता आणि उभा आहे. शेतकरी जगला पाहिजे असं आपणास वाटत असेल तर केंद्रीय पातळीवर व राज्यस्तरावरही शेतीला उदयोगाचा दर्जा दिला पाहिजे. या बाबत चर्चा होऊन अंमल झाला पाहिजे. औदयोगिक क्षेत्रात होणारे बदल आणि शासनाचा त्या बाजूने असणारा कल व त्याचा उद्योगपती घेत असणारा फायदा लक्षात घेता शेती हा उद्योग म्हणूनच मान्यता पावली पाहिजे. तर शेतकऱ्यास न्याय मिळाल्यासारखे होईल तो जगेल आणि देश टिकेल... !!
श्री. हणमंत पडवळ
मु.पो. उपळे (मा.)ता. जि. उस्मानाबाद.
hanamantpadwal8956@gmail
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
"स्वच्छतेचे महत्व"
एक पाऊल स्वच्छतेकडे म्हणत संपूर्ण भारत आता हातात झाडू घेऊन स्वच्छ होण्यासाठी तत्पर झाला आहे, असे आपणास वाटते आहे. पण उघडा डोळे बघा नीट म्हणण्याची वेळ आली आहे.. दोन ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छतेचा गवगवा केला जातो.कचरा नसतो तेथे कचरा करुन झाडलोट करतानाचे फोटोसेशन होते आणि ( जाणीवपूर्वक )केलेला कचरा साफ होतो. पण अंतःकरणातील गहाण तशीच राहते.तद्वतच आसपास असणारी गहाणही तशीच राहून जाते. गाव असो शहर असो वा मेट्रो शहर सर्वत्रच या समस्या म्हणजे गहाणीच्या समस्या आपणास दिसून येतात. आपण काय नि किती गहाण करतो आहोत याचे भान आपणास राहिले नाही.आपले अंगण स्वच्छ करताना शेजाऱ्याचे अंगण घाण करून टाकतो. स्वच्छतेचं महत्व जाणून घेताना संत गाडगेबाबा तसेच महात्मा गांधी यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश आणि आदर्श, स्वच्छाता अभियानाला पुढे घेऊन
जाणारा असाच आहे.कोणतीही शासकीय योजना, शासन आणि जनता यांच्या एकमेकांच्या सहकार्यावर सवलंबून असल्याने शासन करत असलेल्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे गरजेचे असते. प्रतिवर्षी निसर्ग नियमाप्रमाणे ऋतु ..मध्ये बदल होत आसतात.बदलत्या ऋतुत वेगवेगळे आजार पसरत असतात. पण हे आजार पाणी आणि स्वच्छतेसंबंधीत आहेत. आपण राहत असलेला परिसर आणि वैयक्तिक स्वच्छता याबाबत जागृती निर्माण केली तर अनेक जीवघेण्या आजारापासून आपणास मुक्ती मिळेल.
पण सामाजिक भान नसणाऱ्या माणसाला परिसरातील घाण सोडाच पण वैयक्तीक स्वच्छता तरी ठेवता येते का...? पान तंबाखू गुटखा खाऊन मौखीक आरोग्य धोक्यात असणाराही आणि कांहीही अशा प्रकारचे व्यसन न करणारी दोन्हीही
दात स्वच्छ ठेवून मौखिक स्वच्छता ठेवत नाही. म्हणजेच स्वच्छतेचे भान या लोकांना नाही, असेच म्हणावे लागेल. रोज नियमित आंघोळ करुनशरीर स्वच्छता ठेवणे हे देखील उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे.पण कोणतीही बाब जी आरोग्याशी निगडीत आहे ती स्वच्छतेच्याच रस्त्यांनी जाते हे माणसानी लक्षात ठेवावे..... व्यक्तीगत स्वच्छता नंतर आपोआप येणारा क्रम म्हणजे परिसर स्वच्छता. अनेक रोगराईचा जन्म आपल्या बेजबाबादार वागण्याने होते. वाढलेल्या लोकसंख्येमुळे दाटी निर्माण होऊन अनाहुत गरजा व बेजाबदारी यातून अस्वच्छता सहज जन्माला येऊ शकते.आणि नेमके परिसरात तेच आज घडत आहे. बाजारात शिल्लक टाकावू भाज्यांचा ढिग, त्यावर तुटून पडणारी मोकाटजनावरे आणि त्यानी केलेली घाण याकडे 'मला काय त्याचे' या वृत्तीने कोणी लक्ष देत नाही.. पाळीव प्राणी हे मालक नसल्याने बेवारस अवस्थेत सर्वत्र वावरत असतात. त्यांच्यामुळे ही अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसून येते. कितीही आणि कळकळीने आवाहन करुन वा कायदा करून प्लास्टीक पिशव्यांचा वापर बंद होत नाही. याचा वापर सर्वत्र सर्रास होत असतो, परिसर अस्वच्छ करण्यास या पिशव्या चांगलीच भूमिका बजावतात. माणसांबरोबर जनावरांच्या आरोग्यावर याचा सरळ परिणाम होतात, पिशवीत राहिलेले पदार्थ किंवा त्या पदार्थाचा वासाने जनावरे प्लास्टीक पिशवी खातात आणि त्यांचे आरोग्य व कधी जीवही धोक्यात येतो. म्हणून जाडीदारच पिशव्यांचा वापर आणि योग्य विल्हेवाट हे स्वच्छतेच्या व आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. उघडयावर शौचास जाणे म्हणजे स्वतः बरोबर इतरांचेही आरोग्य धोक्यात आणने होय. महाप्रयासानं आणि निकराचा लढा देऊन पोलीओ मुक्त भारत केला आहे.. पोलिओ ही उघड्यावर शौचचीच देणगी होती. त्यामुळे पंतप्रधानानी वा अन्य कोणी स्वच्छतेचे आवाहन करण्याची आणि मग आम्ही स्वच्छता करण्याची परिस्थिती वाट पाहत नसते. त्यासाठी स्वतः स्वच्छतेचे महत्त्व जाणा आणि शहाणे बना. अनेक रोगांना स्वतः हून आमंत्रण देऊ नका. वैयक्तीक स्वच्छतेबरोबरच घर, अंगण, परिसर, गल्ली, गाव कसे स्वच्छ राहिल याकडे लक्ष देण्याची हरेकाची जबाबदारी आहे. स्वच्छतेबरोबर प्रसन्नता येते. प्रसन्नता संपन्नता आणते, आणि आपण ज्या सुखाच्या शोधात आहोत ते सुख या संपन्नेत लाभते.
श्री. हणमंत पडवळ.
मु.पो. उपळे(मा.)ता. जि. उस्मानाबाद.
8698067566.
hanamantpadwal8956@g
No comments:
Post a Comment